पाणंद रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी ‘डिजिटल’ तोडगा  Pudhari
पुणे

Digital solution for road disputes: पाणंद रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी ‘डिजिटल’ तोडगा

‘स्वामित्व’ योजनेतून उपग्रह नकाशांशी जोडणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गावातले पाणंद आणि शेताकडे जाणारे रस्ते वारंवार बंद होण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. आता बंद झालेले पाणंद रस्ते उपग्रह नकाशे आणि ’जीआयएस कोऑर्डिनेट’ च्या मदतीने ’डिजिटल’ केले जातील. यामुळे हे रस्ते पुन्हा बंद करता येणार नाहीत आणि मालकी हक्कावरून होणारे वाद मिटतील.

हा अभिनव प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील 10 गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. (Latest Pune News)

शेतकर्‍यांना मोठा फायदा...

पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम नेहमीच सुरू असते, पण ते पुन्हा बंद होण्याची ‘साखळी’ थांबत नाही. पण आता या नव्या तंत्रज्ञानामुळे रस्ते कायमस्वरूपी खुले राहतील. याचा थेट फायदा शेतकर्‍यांना होईल, कारण त्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग मिळेल.

काय आहे हा अभिनव प्रयोग?

डिजिटल मॅपिंग : ‘स्वामित्व’ योजनेच्या धर्तीवर आता पाणंद रस्त्यांचाही कायमस्वरूपी नकाशा तयार केला जाईल. यासाठी ’एमआरसॅककडून मिळालेल्या नकाशांना रस्त्यांचे ’जीआयएस कोऑर्डिनेट’ जोडले जातील. यामुळे रस्त्यांची अचूक आणि पक्की नोंदणी होईल.

कायदेशीर स्वरूप : भूमी अभिलेख विभागामार्फत या रस्त्यांची नोंद आता गाव नकाशातही घेतली जाईल. एकदा ही नोंद झाल्यावर रस्ते कायमस्वरूपी ’रेकॉर्ड’वर येतील.

जलद निकाल : रस्त्यांच्या डिजिटल नोंदीमुळे त्यावर कोणताही वाद किंवा हरकत आल्यास, मामलेदार न्यायालयात केवळ एक किंवा दोन सुनावण्यांमध्ये निकाल देणे सोपे होईल.

मोहिमेमुळे पाणंद रस्त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल आणि वाद टळतील. शिरूरमधील 10 गावांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यावर संपूर्ण जिल्ह्यात आणि त्यानंतर राज्यभर व देशभरात याची अंमलबजावणी केली जाईल.
-जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT