Dhayari BJP Unopposed Pudhari
पुणे

Dhayari Ward 35 BJP Unopposed: धायरी प्रभाग ३५; भाजपचे मंजूषा नागपुरे व श्रीकांत जगताप बिनविरोध

राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) व आठ अपक्ष उमेदवारांच्या माघारीनंतर भाजपचा निर्विवाद विजय

पुढारी वृत्तसेवा

पुणे /धायरी: राष्ट्रवादी काँग््रेास आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह तब्बल आठ अपक्षांनी आश्चर्यजनकरीत्या माघार घेतल्याने प्रभाग- 35 (सनसिटी- माणिकबाग) मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध निवडून आले.

या प्रभागातील सर्वसाधारण महिलांच्या (ब) गटात मंजूषा नागपुरे यांना उमेदवारी दिली होती. तर सर्वसाधारण (ड) गटातून श्रीकांत जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली होती. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग््रेासमधून भाजपमध्ये गेलेल्या विकासनाना दांगट यांनीही याच (ड) गटातून उमेदवारी अर्ज भरला होता.

पण पक्षाने दांगट यांना माघार घेण्यास सांगितल्याने पक्षादेश मानून त्यांनी तर माघार घेतलीच. पण, पुढाकार घेत इतरांशीही ‌‘चर्चा‌’ केल्याने श्रीकांत जगताप व मंजूषा नागपुरे बिनविरोधी विजयी झाले. दांगट यांच्या पुढाकारानेच झालेल्या या माघारीनाट्याबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे.

प्रभाग क्रमांक 35 मधील ब गटात मंजूषा नागपुरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग््रेासच्या (अजित पवार गट) अयोध्या पासलकर यांच्यासह पल्लवी पासलकर आणि तृप्ती काळोखे या अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

परंतु, चर्चेअंती त्यांनी माघार घेतल्याचे समजते. तर ड गटात श्रीकांत जगताप यांच्याविरोधात शिवसेनेचे (उबाठा) नितीन गायकवाड आणि प्रहार जनशक्ती पक्षांच्या प्रेमराज पवार रिंगणात होते. खेरीज कुलदीप चरवड, समीर रुपदे, अश्विनकुमार शिंदे आणि सचिन भालेकर हेही अपक्ष म्हणून होते. या सर्वांची समजूत काढण्यात जगताप व दांगट यांना यश आले. यासाठी झालेल्या वाटाघाटींच्या चर्चेनेही आज जोर धरला होता. या बिनविरोध निवडीबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जगताप व नागपुरे यांचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT