भोर : राज्य शासनाच्या पुनर्वसनच्या प्रस्तावात अडकलेल्या धानवली (ता. भोर) येथील आदिवासी पाड्याला रस्ताच नाही. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होते. येथील रुग्णांना पाठीवर अथवा झोळीतून उपचारासाठी न्यावे लागते. याकडे मात्र प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.(Latest Pune News)
धानवली येथील आदिवासी पाडावरील ज्येष्ठ नागरिक बनाबाई नथू धानवले यांना जुलाब व ऊलट्यांचा त्रास होत होता. त्यांना निगुडघर येथील रुग्णालयात जाण्यासाठी पाच किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार होते. मात्र रस्ताच नसल्याने वाहनाची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे त्यांच्या जावायाने बनाबाई यांना पाठीवर घेऊन हे अंतर पार केले. त्यानंतर निगडघर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रवासात रुग्णाचे पती आणि दीर या ज्येष्ठ नागरिकांनाही पायीच प्रवास करावा लागला.
या पाड्यावरील नागरिकांची अनेक वर्षांपासून पुनर्वसन करण्याची आणि रस्त्याची मागणी शासन दरबारी धुळखात पडून आहे. प्रत्येक निवडणुकीत या कोळी समाजातील लोकांना नेते आश्वासन देतात आणि निवडणूक संपली की विसरून जातात. त्यामुळे या लोकांच्या नशिबी आयुष्यभर चिखल तुडविणे हेच लिहिल्याचे बोलले जात आहे.
या भागातील नागरिकांना उपचारासारख्या मूलभूत गरजाही वेळेत मिळत नाहीत. त्यासाठीही त्यांना मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागतेय. दरम्यान, भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील असे प्रकार वारंवार समोर येतात. मात्र त्याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे. त्यामुळे येथील नागरिकांना कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
धानवली येथील ज्येष्ठ महिला रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी पाठीवरून नेताना नातेवाईक.