Dhairyashil mohite patil : उजनीवरील एआय डेटा सेंटरबाबत शासनाकडून एवढी गोपनीयता का? 
पुणे

Dhairyashil mohite patil : उजनीवरील एआय डेटा सेंटरबाबत शासनाकडून एवढी गोपनीयता का?

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल, मच्छिमार, शेतकऱयांसह घेतली खासदार शरद पवार यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

बारामती : उजनी धरणावर प्रस्तावित एआय डेटा सेंटर उभारणी प्रश्नी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शनिवारी (दि. ३) बारामतीत ज्येष्ठ नेते. खा. शरद पवार यांची भेट घेतली. इंदापूर व माढा तालुक्यातील शेतकरी व मच्छिमार त्यांच्यासोबत होते. या सेंटरबाबत शासनाकडून एवढी गोपनीयता का बाळगली जातेय असा सवाल खा. मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

खा. मोहिते पाटील म्हणाले, उजनी धरणावर सोलर, ग्रीन हायड्रोडन, एआय डेटा सेंटर व आणखी एक असे चार प्रकल्प येत आहेत. त्यावर सुनावण्या न होता, कोणतीही माहिती बाहेर येवू न देता युद्ध पातळीवर काम सुरु आहे. या डेटा सेंटर प्रकल्पासाठी सव्वा लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एवढी गोपनीयता का पाळली जात आहे हे आम्हाला समजून येत नाही. पारदर्शक पद्धतीने कोणतेही प्रकल्प राज्यात आले पाहिजेत, राज्याचा विकास झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.

उजनी धऱणात आत्ताच पाणी नाही अशी परिस्थिती आहे. उजवा व डावा कालव्यासह धरणावर अवलंबून नऊ प्रकल्प आहेत. त्यातील चार प्रकल्पांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. पाच प्रकल्पांची कामे बाकी आहेत. गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात ६८० मिलीमीटर पाऊस झाला. त्यातून अोढे-नाले, धरणे, पाझर व साठवण तलाव भरले. तरीही मार्चमध्ये धरणाने तळ गाठला होता. उजनीचे पाणी प्रदूषित आहे. डेटा सेंटरसाठी बाष्पीभवनापासून वाचणारे पाणी वापरले जाणार अशी ऐकीव माहिती मिळत आहे. त्यासंबंधी आम्ही राज्याचे मुख्य सचिव, जलसपंदा विभागाचे सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर या प्रश्नी अधिक विसृत्त बोलेन.

मार्चमध्ये उजनी रिकामे होत असताना या सेंटरसाठी पाणी कुठून देणार. उजनीचे बॅक वाॅटर ३० हजार हेक्टरचे आहे. त्यातील काही भागावर सोलर प्रकल्प केला जाईल असे सांगितले जात आहे. आत्ताच १४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सोलर प्रकल्पाने असे किती पाणी वाचणार याची माहिती मिळाली पाहिजे. इंदापूर व माढ्यातील शेतकऱ्यांसह मच्छिमारांचा प्रकल्पाला विरोध आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकरी धरणासाठी संपादित जमिनी कसत आहेत, त्यांची पिके उभी आहेत, त्यांना नोटीसा आल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार ०.५० टीएमसी पाणी लागेल असे सांगितले जात आहे. परंतु वेस्टेज पाणी कुठे सोडणार किंवा प्रकल्पाची अन्य माहिती याबाबत डिटेल्स दिले जात नाहीत असे खा. मोहिते पाटील म्हणाले. डेटा सेंटरद्वारे रोजगार निर्मिती होईल असे सांगितले जात आहे, परंतु ती कशी होणार हे समजले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उजनीतील प्रस्तावित प्रकल्पाबाबत आधी पूर्ण माहिती घेवू. सगळ्या लोकांकडून, तज्ज्ञांकडून हा विषय समजून घेवू असे आश्वासन खा. शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना दिले. यासंबंधी रविवारी (दि. ४) पवार यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर व आमच्यात जर काही घडले असेल तर तो आमच्या घरातील विषय आहे. घरातील भांडण कधी कधी अंगणात येते. परंतु आम्ही तो विषय घरात बसून संपवू असे खा. मोहिते पाटील म्हणाले.

सहकारात राजकारण नको

भाजपकडून सोलापूर, सातारा जिल्हा बॅंकेत ताकद लावली जात असल्याबद्दल ते म्हणाले, आपल्याकडे सहकारात राजकारण आले जात नाही. सर्वपक्षीयांना विश्वासात घेवून या संस्था चालतात. सोलापूरबाबत अद्याप तरी भाजने तसा दावा केल्याचे मी एेकलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT