रामोशी, बेरड समाजाला मुख्य प्रवाहात आणणार; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन Pudhari
पुणे

Saswad News: रामोशी, बेरड समाजाला मुख्य प्रवाहात आणणार; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती साजरी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटविणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खर्‍या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या साहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. रामोशी, बेरड समाजाची शौर्याची परंपरा आजही जिवंत आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भिवडी (ता. पुरंदर) येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण केले.  (Latest Pune News)

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, माजी आमदार संजय जगताप, दौलत शितोळे, अंकुश जाधव, मोहन मदने आदी या वेळी उपस्थित होते.

राजे उमाजी नाईक आर्थकि विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज, उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत, यासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पोलिस भरतीसाठी विशेष योजना, शिक्षण व प्रशिक्षणासाठी महाज्योतीमार्फत योजना राबविल्या जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, शासनाने ओबीसी मंत्रालय, महाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, 42 वसतिगृह व विविध प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय आहे.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री व विविध महामंडळे अस्तित्वात आली. महाज्योतीसारख्या संस्थेमुळे वंचित घटकांतील तरुण तहसीलदार, पोलिस अधिकारी, वैमानिक होऊ शकले.

आमदार पडळकर यांनी मनोगतात राज्य शासनाने इतर मागासांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. पुरंदर येथे राजे उमाजी नाईक यांचे पाच एकरमध्ये स्मारक उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रास्ताविकात रामोशी-बेरड समाजाविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी रामोशी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपटही दाखविण्यात आला. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री गिरीश बापट, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, रामभाऊ जाधव, सुनील चव्हाण यांना ’मरणोत्तर जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT