Garbage Depot Pudhari
पुणे

Devachi Uruli Landfill Scam: देवाची उरुळी कचरा डेपोवर गंभीर आरोप; मिश्र कचरा टाकल्याचा दावा

सायंटिफिक लँडफिलिंगमध्ये नियमभंग; ग्रामस्थांची एनजीटीकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील सायंटिफिक लँडफिलिंग प्रकल्पात आदर्श भारत इन्व्हायरो कंपनीकडून प्रक्रिया न केलेला मिश्र (मिक्स) कचरा टाकून महापालिकेची आर्थिक फसवणूक करत, ग्रामस्थांच्या आरोग्याशीही गंभीर खेळ सुरू असल्याचा आरोप देवाची उरुळी-फुरसुंगीतील ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणी पुराव्यांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महापालिका भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देवाची उरुळी-फुरसुंगीचे नगरसेवक सचिन हरपळे, ॲड. अमोल कापरे, संतोष हरपळे, अजिंक्य ढमाळ आणि अमित हरपळे यांनी हा आरोप केला.

ग्रामस्थांनी सांगितले की, ११ मेपासून देवाची उरुळी येथे बेकायदेशीररीत्या मिश्र कचरा आणून टाकला जात असल्याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. आदर्श भारत इन्व्हायरो कंपनीने या कचऱ्यावर नियमबाह्य प्रक्रिया सुरू केल्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसही बजावली. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला.

सायंटिफिक लँडफिलिंगसाठी केवळ प्रक्रिया झाल्यानंतर उरणारा 'रिजेक्ट' कचरा टाकणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात प्रक्रिया न केलेला मिश्र कचरा तेथे टाकला जात असल्याचे पोलिसांच्या उपस्थितीत नोंदविण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. संबंधित कंपनीच्या सुपरवायझरनेही ही बाब मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.

आदर्श भारत इन्व्हायरो कंपनीचे आंबेगाव, हांडेवाडी आणि रामटेकडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आलेला कचराच लँडफिलिंगसाठी वापरला जात असून, प्रक्रिया आणि लँडफिलिंग अशा दोन्ही कामांची स्वतंत्र बिले महापालिकेकडून घेतली जात असल्याने आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

बोगस बिलांचे पुरावे आणि २०२६च्या कचरा व्यवस्थापन नियमांच्या उल्लंघनासंदर्भातील कागदपत्रांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

संबंधित कंपनीला ब्लॅक लिस्ट करून दोषींवर कारवाई करा

याप्रकरणी संबंधित कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकावे, कचरा प्रक्रिया थांबवावी, तसेच प्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेकडून निधी घेणाऱ्या 'निरी' संस्थेकडून सर्व प्रकल्पांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT