उड्डाणपूल उभारूनही वाहतूक कोंडी कायम; कधी सुटणार प्रश्न Pudhari
पुणे

Pune Traffic: उड्डाणपूल उभारूनही वाहतूक कोंडी कायम; कधी सुटणार प्रश्न

सिंहगड रस्त्यावरील वास्तव चित्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरदरम्यान उभारलेल्या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी झाले. त्यामुळे सिंहगड रस्त्याचा वापर करणार्‍या पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, दुसर्‍याच दिवसापासून या पुलावरील वाहतूक कोंडीने ’असून अडचण, नसून खोळंबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

धायरी, नांदेड, खडकवासला, पानशेत परिसरात जाणार्‍या प्रवाशांबरोबरच देहूरोड-कात्रज बायपासवर जाणारे प्रवासीही सिंहगड रस्त्याचा वापर करतात. नव्या पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडीत न अडकता झटकन पुढे जाता येईल, असा विचार करून या रस्त्याचा वापर करणार्‍यांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे फन टाइम थिएटर येथे उड्डाणपूल संपताच वडगाव येथील वीर बाजी पासलकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

त्यातच फन टाइम थिएटरपासून काही अंतरावर असलेल्या नाहटा कार्यालय येथे पालिकेने रस्ता खोदून ठेवल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. नवीन पुलावरून 2 किलोमीटरचे अंतर विनाअडथळा पार करून पुढे आल्यानंतर अरुंद रस्ता व वीर बाजी पासलकर चौक वडगाव बुद्रुक येथील वाहतूक सिग्नलची वेळ कमी असणे, या अडचणींमुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

खडकवासला, पानशेत, धायरी, नांदेड या भागात जाणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या खालच्या भागातून येणारा वाहनांचा फुगवटाही हिंगण्यापर्यंत जातो. याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी कोंडी कमी करण्यासाठी जागेची पाहणी केली. थोड्याफार सुधारणाही केल्या. मात्र, अद्यापही कोंडीतून सुटका करण्यात त्यांना यश आलेले नाही.

कोंडी सोडविण्यासाठी वाहनचालकांनीच सुचविले उपाय

  • वडगाव बुद्रुक येथील सरसेनापती वीर बाजी पासलकर चौकात धायरीकडे जाणार्‍या वाहनांसाठी सिग्नलची वेळ वाढवावी.

  • रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमणे काढून रस्त्याची रुंदी वाढवावी.

  • नाहटा लॉन्ससमोरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.

  • रस्त्यावर बेकायदा भाजी विक्री करणारे पथारीवाले यांना मनाई करावी.

पासलकर चौकातील सिग्नलमध्ये सुधारणा करण्यात आली असून, दुपारी चारनंतर धायरीकडे जाणार्‍या वाहनांसाठी दहा सेकंद अधिक वेळ दिला आहे, तर विरुद्ध दिशेने पुण्याकडे येणार्‍या वाहनांच्या वेळेत दहा सेकंदांची कपात केली आहे. या बदलाने कितपत फरक पडला, हे पाहण्याकरिता उद्या पुन्हा एकदा महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासमवेत या चौकाची पाहणी करण्यास येणार आहेत. सायंकाळच्या वेळी या परिसरातील पर्यायी रस्त्यांचा वापर करता येईल का, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. येथील वाहतूक चौकीमुळेही एक लेन बाधित होते, हेही निदर्शनास आले असून, त्यावरही उपाययोजना करण्यात येत आहेत.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे शहर पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT