Ajit Pawar News: जिथं पिकतं तिथे विकत नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे असते. मला पुरंदर, शिरूर तसेच सिन्नरमधील कार्यकर्ते इकडे या, तुम्हाला बिनविरोध देतो, असे म्हणत होते; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी बारामतीतून निवडणूक लढतो आहे. या निवडणुकीत तरी भावनिक होऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मी सत्तेवर येणार.. येणार.. येणार असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मी ‘पुन्हा येणार’ या वाक्याची आठवण करून दिली.
शुक्रवारी बारामती तालुक्याचा दौरा त्यांनी सुरू केला. या वेळी प्रत्येक गावात पाच-दहा मिनिटे त्यांनी संवाद साधला. पवार म्हणाले, एवढी कामे केली आहेत, कार्यकर्ते म्हणत होते की तुम्हाला बिनविरोध निवडून आणू. पण म्हणतात ना जिथं पिकते तिथं विकत नसते. माझी प्रशासनावर जी पकड आहे, ती अन्य कोणाचीही नाही.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले एक भाषण गाजले होते. त्यात ते ‘मी पुन्हा येईन,’ असे म्हटले होते. अजित पवार यांनीही शुक्रवारी याचाच पुनरुच्चार केला. आम्ही सत्तेवर येणार.. येणार.. येणार असे पवार म्हणाले. शिवाय मला पुन्हा चांगले पद मिळणार असल्याचेही पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मागे जे झाले ते गंगेला मिळाले. तुम्ही लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असेच ठरवले होते. पण आता प्रचाराच्या निमित्ताने कोणीही आले तरी भावनिक होऊ नका. बळी पडू नका. पुढचे सरकार महायुतीचेच असेल त्यामुळे मला साथ द्या, असे अजित पवार म्हणाले.