भाजपचेच सहा पदाधिकारी महायुतीविरोधात रिंगणात

Maharashtra Assembly Polls | मनधरणीसाठी फिल्डिंग; कोण-कोण माघार घेणार, याची उत्सुकता
Maharashtra Assembly Polls |
सातारा जिल्ह्यातील भाजपचे सहा आजी-माजी पदाधिकारीच महायुतीविरोधात रिंगणात उतरले आहेत.File Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यातील भाजपचे सहा आजी-माजी पदाधिकारीच महायुतीविरोधात दंड थोपटून रिंगणात उतरले आहेत. त्यांचे बंड शमवण्यासाठी भाजपची जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची फौज कामाला लागली असून त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंडोबा माघार घेणार का, हे उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधातच दोघांनी बंड केले आहे, तर पाटण आणि वाई या दोन मतदारसंघांमध्ये मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात भाजपचे पदाधिकारी उभे ठाकले आहेत. कराड उत्तरमधून महायुतीतर्फे भाजपचे मनोज घोरपडे हे उभे आहेत, या ठिकाणी गणेश घोरपडे, महादेव साळुंखे या भाजपच्या निष्ठावंतांनी अर्ज भरला आहे. कराड दक्षिणमध्ये महायुतीतर्फे भाजपचे डॉ. अतुल भोसले उभे असून त्यांच्याविरोधात युवा मोर्चाचे पदाधिकारी गणेश कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दुसर्‍या बाजूला पाटण आणि वाई मतदारसंघांमध्ये पूर्वी झालेल्या त्रासाला कंटाळून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पाटणमधून महायुतीतर्फे शिवसेनेचे ना. शंभूराज देसाई हे रिंगणात उतरले आहेत, त्यांच्याविरोधात जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर वाईमधून महायुतीतर्फे आ. मकरंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, येथे भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, मधुकर बिरामणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पाटण आणि वाई या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मित्रपक्षाचे आमदार असले तरी काही कारणांनी भाजपचे पदाधिकारी दुखावले गेले आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी त्यांची मनधरणी सुरु केली असली तरी उमेदवारांकडून त्यांना भविष्यामध्ये मित्र पक्षाच्या आमदार, कार्यकर्त्यांनी अडचणीत आणू नये, यासाठी शब्द हवा आहे.

सव्वा दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणाने अचानकपणे कूस बदलली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांनी एकत्रित येवून राज्यात सत्ता प्रस्थापित केली होती. राज्याच्या पातळीवर झालेले हे बदल गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांना पचवणे तसेच जडच झाले. त्यामुळे अजूनही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये वैर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या घटकपक्षांनी कृत्रिमरीत्या एकत्र न येता नैसर्गिकरीत्या सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जावे, अशीही अनेकांची इच्छा आहे.

मित्रपक्षाला करून देताहेत अस्तित्वाची जाणीव

एकमेकांची जिरवण्याच्या नादात गाव पातळीवर स्थानिक नेते, कार्यकर्ते इरेला पेटतात. अनेकजण मित्र पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करतात. आपला कार्यकर्ता जपण्यासाठी मित्र पक्षाच्या पदाधिकार्‍याला वेठीस धरतात. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुखावलेल्या अशा पदाधिकार्‍यांनी फणा काढला असून ते आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news