पुणे : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या 'लाडली बहना' योजनेने आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच वाटेवरून आम्ही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून आम्ही लोकांचा, विशेषतः महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा आणि ऐतिहासिक विजय असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले
राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, या विश्वासामुळे आमचे बॅलेट बॉक्स भरभरून वाहिले आणि त्याचे फलित म्हणजेच विधानसभेच्या २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक जीत आहे. राज्यात महायुतीचे एक बळकट सरकार स्थापन झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शिवराजसिंह चौहान यांच्याकडे विशेष आभार मानत, त्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला मतदारांची मने जिंकण्याचा मार्ग दाखवला. आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ही योजना राबवली आणि त्यातून मतदारांचा विश्वास मिळविला. त्यामुळेच हे यश शक्य झाले. आम्हाला विजयाचा मार्ग दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे मन:पूर्वक आभार मानतो