पुणे

Pimpri news : पिंपरी शहरात डेंग्यूचा डंख कायम

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गेल्या महिनाभरात डेंग्यूचे 55 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात 60 बाधित रुग्ण आढळून आले होते. म्हणजे अद्यापही डेंग्यूची साथ नियंत्रणात आलेली नाही. महापालिका आरोग्य विभागाने डासांच्या अळ्या आढळून आलेल्या 292 आस्थापना, नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. 95 जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 39 हजार 500 रुपये इतका दंड वसूल केला आहे. शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली.

मात्र, जुलै महिन्यापासून डेंग्यूचे प्रत्यक्ष बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात 36, ऑगस्टमध्ये 52, सप्टेंबर महिन्यात 60 तर, ऑक्टोबर महिन्यात 25 तारखेपर्यंत 55 रुग्ण आढळून आले. गेल्या दहा महिन्यांत एकूण 8 हजार 854 संशयित रुग्ण आढळले. तर, 203 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

महिनाभरापासून हिवतापाची साथ नियंत्रणात

  • शहरात गेल्या महिनाभरापासून हिवतापाची (मलेरिया) साथ नियंत्रणात आहे. सप्टेंबर महिन्यात हिवतापाचा 1 बाधित रुग्ण आढळला होता. तर, जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत 16 बाधित रुग्ण आढळले आहेत. तथापि, ऑक्टोबर महिन्यात हिवतापाचा एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सध्या तरी ही साथ नियंत्रणात आली आहे. चिकुनगुणियाचे गेल्या दहा महिन्यांत 42 संशयित रुग्ण आढळून
    आले आहेत. मात्र एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही.

कंटेनर सर्वेक्षण आणि कारवाई

  • महापालिका आरोग्य विभागाकडून ऑक्टोबर महिन्यात कंटेनर सर्वेक्षणअंतर्गत गेल्या 25 दिवसांत 2 लाख 72 हजार 442 घरे तपासण्यात आली. त्यापैकी 4 हजार 672 घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या. टायर, पंक्चर आणि भंगार मालाची एकूण 197 दुकाने तपासण्यात आली. तर, 255 बांधकामे तपासली गेली. डास अळ्या आढळल्याप्रकरणी आणि पुरेशी दक्षता न घेतल्याबद्दल 292 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. 95 जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 39 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT