खडकवासला: पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संपादित जमिनीतील धरणाच्या बांधकामापासूनची गोरगरीब धरणग्रस्तांची घरे जलसंपदा विभागाने अन्यायकारक कारवाई करून जमीनदोस्त केली. मात्र, दुसरीकडे याच जमिनीवरील धनदांडग्यांची रिसॉर्ट, हॉटेल, फार्म हाउस आदी अतिक्रमणे अबाधित आहेत.
याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. याबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी जलसंपदा विभागाच्या या अन्यायकारक कारवाईकडे सरकारचे लक्ष वेधले. (Latest Pune News)
राजगड तालुक्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आंबेगाव खुर्द, वांजरवाडी येथे 25 फेब्रुवारी 2025 रोजी धरणग्रस्त शेतकरी किसन शंकर कडू, विजय दिनकर कडू आणि हरिभाऊ शंकर कडू यांच्या पूर्वकालीन घरांवर खडकवासला जलसंपदा विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई करत तिन्ही घरे जमीनदोस्त केली.
ही घरे अनेक वर्षांपासून अस्तित्वात होती आणि या कुटुंबांची घरे, शेती पानशेत धरणात गेली आहेत. याच परिसरातील पाणलोट क्षेत्रात हॉटेल, रिसॉर्ट आणि व्यावसायिक बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे आ. तापकीर यांनी या वेळी सांगितले.
आ. तापकीर यांनी सभागृहात गुंजवणी, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या अनधिकृतपणे उभ्या असलेल्या हॉटेल, रिसॉर्ट आणि व्यावसायिक बांधकामांची सविस्तर यादी व अहवाल सादर करण्यात यावा, अतिक्रमणधारकांची नावे, मालकीचा प्रकार, संबंधित भूखंडाची स्थिती आणि त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या अथवा प्रलंबित कारवाईची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली.
एकाच पाणलोट क्षेत्रात गरिबांच्या घरांवर कारवाई करत श्रीमंत व्यावसायिकांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असेल, तर सरकारने त्याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. तसेच परिसरातील अतिक्रमणांवर निष्पक्षपणे कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांनी विधानसभेत केली.