पुणे

पुणे : उन्हाने कोमेजला कटफ्लॉवर ! फुलबाजारात मागणी घटली

अमृता चौगुले

शंकर कवडे

पुणे : लग्नसराई म्हटली की पुष्पहारापासून फुलांची सजावट आलीच. मात्र, उन्हाचा तडाखा वाढल्याने कटफ्लॉवरच्या सजावटीकडे वधू-वर पक्षांचा कल कमी झाला आहे. परिणामी, सजावटीसाठी लागणार्‍या कटफ्लॉवरला गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात मागणी घटली आहे. पावसामुळे यंदा ऐन उन्हाळ्यातही बाजारात फुलांची आवक चांगली आहे. मात्र, लग्नसराई असूनही एरवीच्या तुलनेत अपेक्षित मागणी नसल्याने कटफ्लॉवरच्या भावात पंचवीस टक्क्यांनी घसरण झाली आहे.

लग्नसोहळा साधा असो की शाही, त्यामध्ये पुष्परचना हा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरतो. त्यानुषंगाने फुलबाजारात राज्यासह परराज्यांतून विविध प्रकारच्या फुलांची मोठी रेलचेल असते. कटफ्लॉवरमध्ये डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्चिड आदी फुलांना मोठी मागणी असते. तर, केशरचनेसाठी जिप्सोफिला, मोगरा आदी फुलांना पसंती मिळते.

यंदा पावसामुळे ऐन उन्हाळ्यातही फुलांच्या उत्पादनात वाढ झाली. लग्नसराईच्या काळात फुलांना मागणी वाढून दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, उन्हाचा चटका उशिरापर्यंत कायम राहत असल्याने फुले सुकून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वर-वधू पक्षासह सजावटकारांकडून खर्‍या फुलांची सजावट टाळण्यासह नकली फुलांचा वापर सुरू केला आहे.

इथून येतात फुले

जिल्ह्यातील खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव (दाभाडे) येथून मोठ्या प्रमाणात फुले बाजारात दाखल होतात. याखेरीज दक्षिणेतील राज्यांतूनही सजावटीसाठीची फुले मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्गाकडून मागविण्यात येतात.

लग्नसराईत शेवटच्या तारखेपर्यंत कटफ्लॉवरचे दर टिकून राहतात. पावसामुळे फुलांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने उत्पादनात वाढ झाली. मात्र, उन्हाच्या चटक्यामुळे सजावटीसाठी फुलांना मागणी कमी राहून दरात घसरण झाली. ऊन कमी असते तर आवक वाढूनही फुलांना चांगले दर मिळाले असते.

– सागर भोसले, फूल व्यापारी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT