पुणे

पुरंदरच्या वाटाण्याला गुजरातमध्ये मागणी

अमृता चौगुले

दिवे : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यातील चविष्ट वाटाणा हंगाम सध्या बहरात आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने हंगामाला फटका बसला आहे. मधल्या काळात झालेल्या थोड्या फार पावसाने अनेक शेतकर्‍यांनी वाटाण्याची पेरणी केली. परंतु पावसाने उघडीप दिल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. तरीदेखील काही शेतकर्‍यांनी तुषार सिंचनचा वापर करत कसेबसे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे बाजारात मालाची आवक बर्‍यापैकी होत आहे. मात्र, बाजारभाव जेमतेम आहेत. सध्या किलोला 40 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.

दिवे परिसरात पाऊस लांबला होता. परिणामी, पेरणी उशिरा झाली. एकंदरीत तालुक्यातील पेरणी मागेपुढे झाल्याने बाजारात आवक कमी-जास्त आहे. दिवे येथील बाजारात मालाची भरपूर आवक होत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून व्यापारीदेखील खरेदीसाठी दिवे बाजारात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे पेण, पनवेल, अलिबाग, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूरबरोबरच अगदी गुजरात राज्यातदेखील मोठ्या प्रमाणावर वाटाणा पाठविला जात आहे. शनिवारी (दि. 19) झालेल्या आवकमध्ये सुमारे 6 टन वाटाणा स्थानिक व्यापारी महेश काकडे यांच्यामार्फत गुजरातमधील व्यापार्‍यांनी खरेदी केला. यावर्षी राज्याबाहेरील व्यापारी दाखल झाल्याने वाटाण्याला बर्‍यापैकी उठाव आहे. गुजरातमधील प्रत्येक भागात पुरंदरच्या चविष्ट वाटाण्याला प्रचंड मागणी असल्याचे काकडे यांनी सांगितले. तर पावसाने ओढ दिल्याने वाटाणा पीक हातातून गेले आहे. त्यामुळे 20 गुंठे क्षेत्रात फक्त 100 किलो माल सापडल्याचे वाटाणा उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर झेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT