पुणे: उन्हाळ्यातही देशातील दिल्ली, पुणे, पाटणा, चंदीगड आणि लखनऊ या शहरांतील हवाप्रदूषणाची पातळी धोक्याच्या स्थितीत आहे. या शहरातील सूक्ष्म धूलिकणाची (पीएम 10) पातळी जास्त असून, राष्ट्रीय गुणांकनपातळी ओलांडली आहे. तर, दुसर्या बाजूला मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता शहरांची हवा उन्हाळ्यात कमी प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरातील रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. यात देशभरातील सुमारे अकरा शहरे निवडली असून मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, पाटणा, चंदीगड,लखनऊ, कोलकाता, हैदराबाद, बंगरुळू, चेन्नई या शहरांचा प्रामुख्याने समावेश आहे. (Latest Pune News)
यात सन 2021 ते 2024 या उन्हाळी हंगामातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यातही सूक्ष्म धूलिकण (पीएम 10) या धूलिकणांच्या प्रदूषणाचा अभ्यास यात करण्यात आला आहे. हवाप्रदूषणाची पातळी ही 60 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी हवी आहे.
मात्र, बहुतांश शहरांची पातळी दुपटीने वाढली आहे. राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानांकनाची पातळी बहुतांश शहरांनी ओलांडल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डेटावर आधारित हा अहवाल आहे.
ही आहेत कारणे...
पीएम-10 ची पातळी उत्तर भारतात पिकांचे अवशेष जाळणे, वाहनांचे उत्सर्जन यामुळे वाढत आहे.
प्रतिकूल हवामान परिस्थिती यासारखे घटक कारणीभूत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय आणि शहरी पातळीवर विविध हवेच्या गुणवत्तेवर उपाययोजना करूनही घट झालेली नाही. त्यामुळे धोरणांचा प्रभावीपणा आणि अंमलबजावणीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
हे प्रदूषित घटक 10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे हवेतील कण आहेत, जे श्वसन प्रणालीमध्ये खोलवर प्रवेश करू शकतात. ज्यामुळे श्वसनरोग, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या आणि अकाली मृत्युदरासह गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.
सर्वांत जास्त प्रभावित शहरे
दिल्ली
पुणे
पाटणा
चंदीगड
लखनऊ
आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेवर सन 2017 पासून काम करीत आहोत. या अहवालात सन 2021 ते 2024 या उन्हाळी हंगामांचा अभ्यास केला गेला. यात दिल्लीची हवा सर्वाधिक प्रदूषित असून, त्यापाठोपाठ पुण़े, पाटणा, चंदीगड आणि लखनऊ या शहरांचा समावेश आहे. तर मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता शहरातील हवाप्रदूषणात उन्हाळ्यात घट दिसून आली आहे. लवकरच 2025च्या उन्हाळी हंगामाचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे.- केविन जोशी, डेटा अॅनालिस्ट, रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस, पुणे