आळेफाटा ; पुढारी वृत्तसेवा
राजुरी (ता. जुन्नर) शिवारातील गोगडीमळा येथील कांद्याच्या शेतात आज (शनिवार) पहाटे दोन बिबट्यांची झुंज होऊन त्यात एका मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. हि घटना सकाळी उघडकीस आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजुरी शिवारातील गोगडीमळा येथील उमेश शंकर नाईकवाडी हे आज सकाळी घराच्या बाजूला असलेल्या गटनंबर १४३४ मध्ये असलेल्या कांद्याच्या शेतात पाणी भरण्यास गेले. त्याच दरम्यान त्यांना कांद्याच्या शेताच्या वाफ्यात बिबट्या आढळून आला. त्यांनी थोडे पुढे जाऊन पहिले असता, त्या बिबट्याच्या तोंडातून रक्त येत होते. बिबट्या हालचाल करत नव्हता. नाईकवाडी यांनी आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले, तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या विषयी माहिती सांगितली.
दरम्यान आळे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक त्र्यंबक जगताप व स्वप्नील हाडवळे हे घटनास्थळी आले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश खिलारी यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यात बिबट्याच्या मानेवर, पाठीवर, तोंडाखाली दुसऱ्या बिबट्याचा पंजा लागल्याने जखमा झाल्या होत्या. मृत बिबट्या मादी जातीचा दीड वर्षे वयाचा असल्याचे वनपाल संतोष साळुंखे यांनी सांगितले. दोन बिबट्यांच्या झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
राजुरी परिसरात बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने अनेकदा नागरिकांवरही हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शेतात काम करणाऱ्या लोकांनाही अनेकदा बछडे आढळून आले आहेत. वन विभागाने या सगळ्यांची तातडीने दखल घेत त्याचा बंदोबस्त कारत पिंजरा लावण्याची मागणी उमेश नायकोडी, निवृत्ती औटी व महेश औटी यांनी केली आहे.