खुटबाव : ओढ्याच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी (दि. २) सकाळी ९ च्या सुमारास दौंड तालुक्यातील खोर गावच्या हद्दीतील खिंडीचीवाडी येथे उघडकीस आली. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, खोर हद्दीतील खिंडीचीवाडी येथील शेत जमीन गट क्रमांक ८९ शेजारील वाहत असलेल्या ओढ्याच्या पाण्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने याची पोलिसांना माहिती दिली. यानंतर यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे आपल्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, मारोती मेतलवाड, जालिंदर बंडगर, संतोष कदम, दत्तात्रय काळे यांच्यासह घटनास्थळी दाखल पंचनामा केला.
काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनोळखी तरुणाचा मृत्यू गेल्या १५ ते २० दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे अनोळखी तरुणाची अद्यापी ओळख पटू शकलेली नाही. यवत पोलिसांनी घटनेची नोंद केली असून त्या तरुणाचा मृत्यू की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.