पुणे: शहरातील येरवडा, वाघोली, लोणीकंद, विश्रांतवाडी, चंदनगर भागाचा समावेश असलेल्या परिमंडळ चारच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू तयार करणार्या आणि देशी-विदेशी मद्याची बेकायदा विक्री करणार्यांवर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. सलग दुसर्या आठवड्यात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
31 पोलिस अधिकारी आणि 72 पोलिस अंमलदार अशा शंभरहून अधिक जणांच्या पथकाने रस्त्यावर उतरून तब्बल 22 अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Latest Pune News)
शनिवारी (दि.12) पहाटेपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली होती. यामध्ये 508.2 लिटर हातभट्टी दारू, 5 हजार 550 लिटर रसायन आणि इतर अवैध साहित्य नष्ट करण्यात आले. केवळ एका आठवड्याच्या कालावधीत ही दुसरी मोठी मोहीम असल्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, काहींनी अड्डे बंद केल्याची माहिती आहे.
या मोहिमेअंतर्गत वाघोली, लोणीकंद, येरवडा, विश्रांतवाडी, चंदननगर या परिसरातील डोंगराळ भाग, नदीकिनारे आणि इतर आडवाटेच्या ठिकाणी दारू तयार करणार्या अड्ड्यांवर तसेच विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. हातभट्टी दारू तयार करण्यासाठी सुमारे दहा दिवसांचा कालावधी लागतो.
मात्र, या प्रक्रियेच्या मध्यातच कारवाई केल्यास संपूर्ण साखळी (सायकल) खंडित होऊ शकते. त्यामुळे यापुढे आठवड्यातून एकदा नियमितपणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली. ही संपूर्ण कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 4 मधील विविध पोलिस ठाण्यांनी समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वी केली.
अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रेत्यांच्या विरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या परिसरात चालणार्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवून पोलिस तत्काळ कारवाई करतील.- सोमय मुंडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ चार