रामदास डोंबे
खोर: दौंड तालुका हा भीमा नदीकाठावर वसलेला असला तरी दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव टंचाई जाणवते. शासनाच्या जलजीवन मिशनसह विविध नळपाणी योजना गावोगावी कार्यान्वित झाल्या असल्या तरी अजूनही उन्हाळ्यात अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही लोकांना ‘थेंब-थेंब’ पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. (Latest Pune News)
मागील काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाने सर्वांना स्वच्छ व पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले. जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यात अनेक योजना मंजूर झाल्या. काही गावांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्यात आली, तर काही ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली. आरंभी ग्रामस्थांमध्ये आनंद होता.
‘आता रोज घरी नळाला पाणी येईल’ ही अपेक्षा होती. मात्र हे अपेक्षांचे ओझे केवळ पूर्णत्वाला कधी जाणार हे कळण्यास मार्ग उरला नाही. आजही गावच्या विकासावर पाणीपुरवठा योजनांची टांगती तलवार पहावयास मिळत आहे.
सतत अडथळ्यांची मालिका
आजही अनेक गावांत जलवाहिनी टाकली पण पंप सुरूच झाला नाही. अनेक ठिकाणी वीजपुरवठ्याच्या खंडामुळे पंप बंद पडतात. गळतीमुळे पाणी वाया जाते, पण दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलली जात नाहीत. देखभालीसाठी निधीअभावी योजना काही महिन्यांतच ठप्प होतात. यामुळे आजही दौंड तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. अनेक ठिकाणच्या गावात महिलांना आणि मुलींना लांबवर जाऊन पाणी आणण्याची वेळ येते.
टँकरने पाणीपुरवठा करणे हा तात्पुरता उपाय आहे. ग्रामपंचायतींना दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. शिवाय टँकर वेळेवर पोचले नाहीत तर गावात गोंधळ उडतो. अनेक वेळा पाण्याचे राजकारणही रंगते. ग्रामस्थांमध्ये वाद होतात.
पुढील वाटचाल अशी असावी....
दौंड तालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण आणि शेती यामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी जलजीवन मिशनचा वेग वाढवणे, प्रत्येक गावात जलवाहिनी व पंपिंग स्टेशनची नियमित देखभाल करणे, पावसाचे पाणी साठवण्याचे प्रकल्प वाढविणे, टँकरवरील अवलंबित्व कमी करून गावाचा लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे. ही पावले उचलली तरच पाणीटंचाईला कायमस्वरूपी उपाय मिळू शकेल.