खोर : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. तीव— स्वरूपाचा उन्हाळा सुरू झाला असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव पूर्णतः कोरडा पडल्याने खोर, देऊळगाव गाडा, पडवी, जिरेगाव, वासुंदे, रोटी, हिंगणीगाडा, नारायण बेट, माळवाडी परिसरातील पाणी योजना पूर्णतः बंद झाल्या आहेत. राज्य शासनाने 'हर घर जल' योजना अंमलात आणली. मात्र ही योजना वेळेत पूर्ण न झाल्याने आज दौंड तालुक्याच्या दक्षिण भागाला मोठा टंचाईचा फटका बसला गेला आहे.
शेतीला तर नव्हेच मात्र नागरिकांना पिण्याला देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी वणवण करण्याची वेळ आली आहे. दौंड पंचायत समितीच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दुष्काळी परिस्थितची पाहणी करून या टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करण्याच्या संदर्भात प्रांत विभागाला मागणी केली होती. त्यानुसार खोर गावाला पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आला आहे, तर पडवी व जिरेगावला देखील येत्या दोन दिवसात टँकर सुरू करणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले.
सिंचन योजनांचे पाणी तरी सोडा, अशी हाक खोर परिसरातील नागरिक करीत आहेत. पुरंदर उपसा योजनेतून खोरच्या डोंबेवाडी पाझर तलावात एक उन्हाळी आवर्तन सोडले गेले तर किमान दोन ते महिन्यांचा शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लागला जाईल, अशी माफक अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाची आहे.
सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून उगम झालेल्या शिवगंगा नदीने तळ गाठला असून, आजूबाजूच्या गावांना तसेच शेतकर्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ग्रामपंचायतींकडून टँकरसाठी प्रस्ताव दिले होते. कल्याण व मोरदरी गावचे प्रस्ताव मंजूर झाले असून, इतर गावांचे प्रस्ताव अजूनही लालफितीत अडकले आहेत. सध्या हवेली तालुक्यातील कल्याण, रहाटवडे, कोंढणपूर, शिवापूर, तसेच भोर तालुक्यातील रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे या गावांतील काही शेतकरी शिवगंगा नदीतील पाण्यावर शेती करतात.
मात्र, आता शिवगंगा नदीच आटल्याने या शेतकर्यांपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यावाचून शेतीची मशागत रखडली असून, आता वळवाच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. नदी कोरडी पडल्याने गावातील विहिरींनीसुद्धा तळ गाठायला सुरुवात केली असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या मोरदरी गावामध्ये सह्याद्री उद्योग समूह यांच्या टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, उर्वरित गावांचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच त्या गावांना पाणी मिळणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
हेही वाचा