दौंड तालुक्यात ग्रामपंचायत-प्रशासनात समन्वयाची दरी; अनेक गावांची अपेक्षित प्रगती होईना  Pudhari
पुणे

Daund News: दौंड तालुक्यात ग्रामपंचायत-प्रशासनात समन्वयाची दरी; अनेक गावांची अपेक्षित प्रगती होईना

गावाच्या सर्वांगीण विकासात स्थानिक ग्रामपंचायती आणि प्रशासन या दोन घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: गावाच्या सर्वांगीण विकासात स्थानिक ग्रामपंचायती आणि प्रशासन या दोन घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दौंड तालुक्यातील अनेक गावांत या दोन यंत्रणांमधील संवादाचा अभाव, अपुरे नियोजन आणि निधीच्या कमतरतेमुळे अपेक्षित प्रगती साधली जात नाही, असे वास्तव दिसून येत असल्याने गावविकासात स्थानिक ग्रामपंचायती आणि प्रशासनाची भूमिका यांच्यात मोठी दरी निर्माण होत चाललेली पाहावयास मिळत आहे.

दौंड तालुक्यातील अनेक गावांनी स्वच्छ भारत अभियान, ग्राम सौरदीप योजना, जलजीवन मिशन, अशा विविध योजनांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. मात्र, अनेक गावांच्या विकास कामांबाबतची अडचण अजूनही दूर झालेली नाही. तालुका प्रशासन, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि विविध शासकीय विभागांचा पाठिंबा नसेल तर ग्रामपंचायतींना विकासकामे राबविणे कठीण जाते. (Latest Pune News)

प्रशासकीय अधिकार, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मंजुरी ही विकासाच्या गतीला लागणारी महत्त्वाची चाके आहेत. मात्र, दौंड तालुक्यात अनेक प्रकल्प जसे की पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि अंतर्गत रस्ते बांधणी, प्रशासन विभागाचा सक्रिय सहभाग नसल्याने वेळेत पूर्ण झालेले नाहीत.

दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला गेला असून, आज रोजी या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करून कारभार पाहिला जात असल्याने गावगाड्याच्या विकासाला मोठी खीळ बसत आहे. अनेकवेळा प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे विकासकामांमध्ये अडचणी येऊन विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात खोळंबा होत आहे.

अडचणी आणि आव्हाने

  • निधीची कमतरता : गावांच्या लोकसंख्येनुसार मिळणारा निधी अनेकदा पुरेसा नसतो.

  • योजनांबाबत जागरूकतेचा अभाव : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची पूर्ण माहिती नसल्याने अनेक लाभ गावांपर्यंत पोहचत नाहीत.

  • भ्रष्टाचार आणि राजकारणाचा हस्तक्षेप : काही ठिकाणी विकासापेक्षा वैयक्तिक फायद्यांना प्राधान्य दिले जाते.

भविष्यातील वाटचाल

गावोगावी विकासाचे नवे मॉडेल तयार करण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासन यांचा समन्वय वाढविणे गरजेचे आहे. पारदर्शकता, लोकसहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योजनांची योग्य अंमलबजावणी, हीच पुढील वाटचाल ठरावी, असा संदेश दौंड तालुक्यातील अनेक गावांनी घेतला पाहिजे. गावच्या प्रगतीची चावी ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांत आहे. योग्य नियोजन, सचोटी आणि लोकसहभाग असेल तर दौंड तालुक्याचा ग्रामीण विकास राज्यात आदर्श ठरू शकतो, हे मात्र तितकीच सत्य परिस्थिती असेल.

यशस्वी उदाहरणे

दौंड तालुक्यातील काही गावांनी ग्रामसभेच्या माध्यमातून एकत्रित निर्णय घेत स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शिक्षणाबाबतीत आदर्श उभा केला आहे. उदाहरणार्थ : ’वरवंड हे शिक्षणाचे माहेरघर’ अशी ओळख निर्माण करून तालुक्याला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT