Fetal Determination Pudhari
पुणे

Daund Sex Determination Racket: दौंड गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक, काही डॉक्टर फरार

आरोग्य विभागाच्या धडक कारवाईत अनेक सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्रांवर छापे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दौंड तालुक्यात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा जिल्हा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले आणि उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या नेतृत्वात राबवलेल्या विशेष मोहिमेत अनेक धक्कादायक बाबीसमोर आल्या असून, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे, तर काही संशयित डॉक्टर अद्याप फरार आहेत.

दौंड तालुक्‍यातील केडगाव येथे गर्भलिंग निदानाचे रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती. याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात अण्णासाहेब गिरी, अतुल अंकुश जाधव आणि नरेंद्र ठाकरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी ४ विशेष पथके तैनात केली होती. या पथकांनी २५ सोनोग्राफी सेंटर, २० गर्भपात केंद्र आणि १९ नर्सिंग होमची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान 'लवांगिरे हॉस्पिटल' येथे वैद्यकीय गर्भपात अधिनियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने या रुग्णालयावर कारवाई करत ते सील करून येथील मशीन जप्त केली आहे. याप्रकरणी डॉ. तुकाराम मोटे यांना अटक करण्यात आली असून, डॉ. स्वाती लवांगिरे फरार असल्याचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

कोणाचीही गय केली जाणार नाही

गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपातासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही. या मोहिमेमुळे दौंड तालुक्यातील अवैध वैद्यकीय व्यवसायांना मोठा चाप बसला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT