उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव अस्वस्थता पसरली असून, गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक पूर्णपणे संपल्याचे चित्र दिसत आहे. चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर कोयत्याने प्राणघातक हल्ला होऊनही पोलिस यंत्रणा निष्क्रिय राहिल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी (दि. 12) दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) शी संबंधित आफताब जुनेद सय्यद (वय 23, रा. फौजदार चाळ) या युवकावर घरगुती कारणावरून कोयता तसेच लाथा-बुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडली. तरीही घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली; कुणीही युवकाला सोडवण्यासाठी पुढे आले नाही. पोलीस ठाण्यासमोरच, तेही दिवसाढवळ्या अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण नेमके कुठे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, एवढी गंभीर घटना घडूनही ‘तक्रार नाही’ या कारणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हा प्रकार कैद झाला असण्याची शक्यता असतानाही पोलिसांनी मौन बाळगल्याने राजकीय दबावाखाली कारवाई टाळली जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
दौंड शहराची वाटचाल ‘बिहार पॅटर्न’कडे सुरू असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. खुलेआम भांडणे, मारामाऱ्या, अवैध धंदे आणि राजकीय आश्रयामुळे गुन्हेगारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाईल, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, निवडणुका व निकाल लागूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. यामागे नेमका कोणता ‘गौडबंगाल’ आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे ग््राामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनवेळा दौंड शहराला भेट दिली. मात्र, स्थानिक पत्रकारांशी संवाद टाळला. कोयता गँग, अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारी यावर पोलीस प्रशासन बोलण्यास कचरते आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेळीच ठोस आणि निर्भीड कारवाई झाली नाही तर दौंड शहरात एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे पोलीस प्रशासनावर राहील, अशी तीव भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दूरध्वनी दोन महिन्यांपासून बंद
दरम्यान, दौंड पोलीस ठाण्याचा दूरध्वनी गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी विचारणा केली असता, ‘वर तक्रार केली आहे’ एवढेच उत्तर मिळत आहे. शहरात सतत भांडणे, मारामाऱ्या व चोरीच्या घटना घडत असताना नागरिकांनी तक्रार करण्यासाठी नेमका कोणत्या क्रमांकावर संपर्क साधायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 10 जण जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिसांना भमणध्वनीवर देण्यात आली. मात्र, पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याने माहिती उशिरा मिळाल्याचे बोलले जात आहे. भविष्यात अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अधिक सतर्कता दाखवणे अत्यावश्यक आहे.