दौंड : एकमेकांच्या कुटुंबाचा जाहीरपणे उध्दार करणारे नेते दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्याने शहरात सध्या त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेमसुख कटारिया यांचे नागरी हितसंरक्षण मंडळांच्या आश्रयाला आता या मंडळाला कायम विरोध करणारे आले आहेत. कारण, राज्यातील सत्ताधारी भाजपने नागरी हितसंरक्षण मंडळाला आपल्या पदराखाली घेतले आहे.(Latest Pune News)
मागील दोन वर्षांत एकमेकांची उणीदुणी काढून व कुटुंबांचा उद्धार करून तसेच न्यायालयीन प्रक्रियेत विकासकामांना अडवून त्या कामावर मनाई आणून एकमेकांच्या तंगड्या पिरगळणारे, विकासकामांना खीळ घालणारे नेते निवडणुकीसाठी एकत्र आल्याने अनेक निष्ठावंत नाराज झाले आहेत. कोणीही आयरा-गयरा येतो व मला तिकीट पाहिजे, पाच-पन्नास लोकांचा जमाव-युवक बरोबर आणतो व मला तिकीट द्या, असे म्हणतो. त्यामुळे प्रेमसुख कटारिया आणि भाजपचे आमदार राहुल कुल त्रस्त झाले आहेत.
दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे महिला ओबीसीकरिता राखीव असून, यामध्ये फारसा कोणी रस दाखविलेला नाही असे आजचे तरी चित्र आहे. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला नागरिक हितसंरक्षण मंडळ, भाजप, आरपीआय आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व इतर मित्रपक्ष आहेत तर राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाकडून शिवसेना, काँग््रेास व इतर त्यांचे छोटे मित्रपक्ष दुसऱ्या बाजूला आहेत. उमेदवार मात्र दोन्ही गटांमध्ये अद्यापही एकाचे नाव अंतिम केलेले नाही. दोघेही कोण आपले प्रथम उमेदवार जाहीर करतो, याकडे नजर लावून बसले आहेत. नागरिक हितसंरक्षण मंडळ व भाजप एकत्रित निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. परंतु, अनेक जुन्या जाणकारांचे असे म्हणणे आहे की, दौंड शहराच्या विकासाकरिता विद्यमान भाजपचे आमदार राहुल कुल यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला; मग भाजप स्वबळावर का नाही किंवा कमळाच्या चिन्हावर का नाही लढत? राष्ट्रवादी गटात देखील रमेश थोरात, वीरधवल जगदाळे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ते कोणता उमेदवार कुठे जाहीर करतात व काय निर्णय घेतात, हे पाहणे गरजेचे आहे.
नागरिक हितसंरक्षण मंडळाला मागील काही वर्षांत पाठ दाखविलेले नेते पुन्हा स्वगृही परतले आहेत. ते कितपत त्यांचे एकनिष्ठ राहणार की फक्त आपल्यावर आलेले गंडांतर टाळण्याकरिता यांच्याकडे आलेत, यावर कार्यकर्ते साशंक आहेत. नागरिक हितसंरक्षण मंडळाला हातातोंडाशी आलेला घास घालविण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात कुल-कटारिया यांनी ताक फुंकून पिणे गरजेचे आहे, नाहीतर एकतर त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल किंवा मतदार याचा वचपा मतपेटीतून काढेल, हे मात्र निश्चित. आगामी दोन-तीन दिवसांत कोण काय निर्णय घेते, हे पाहणे गरजेचे आहे, नाहीतर दौंड नगरपालिकेत ‘आपण दोघे भाऊ भाऊ नगरपालिका वाटून खाऊ’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या चार दिवसांत सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.