

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबुत येथे बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी (दि. 12) मृत रोहन बोंबे, शिवन्या बोंबे तसेच भागूबाई जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा. यापुढे एखादा संशयास्पद बिबट्या आढळला तर त्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी या वेळी वन विभागाला दिले.(Latest Pune News)
पिंपरखेड, जांबुत येथे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनेत तीन मृत्यू झाल्याने मोठा उद्रेक होऊन रास्ता रोको आंदोलन झाले होते. वनमंत्र्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. वनमंत्री गणेश नाईक यांनी तीनही घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले.
ग्रामस्थांशी संवाद साधताना नाईक म्हणाले की, घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. मी या खात्याचा मंत्री म्हणून नाही, तर माणूस म्हणून या ठिकाणी आलो आहे. लोकांचा दोष मला लागला तरी चालेल. परंतु, कुणाचा जीव जाता कामा नये. आता यापुढे घटना नको. झालेले ते पुरे झाले. यापुढे अशा घटना घडू नयेत. भविष्यकाळात बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही तर भटक्या कुर्त्यांसारखे बिबटे भटकतील, अशी परिस्थिती या भागात आहे.
मी या खात्याचा मंत्री झालो ते बदनाम होण्यासाठी झालो का काय? असा प्रश्न वनमंत्र्यांनी विचारला आणि भविष्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्या आणि मानवामधील संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जी यंत्रणा यशस्वीरित्यी वापरली गेली, ती यंत्रणा आता पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी राबविण्याचे आदेश त्यांनी दिले. घटनेतील पीडितांना योग्य ती शासकीय मदत लवकरात लवकर मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, आशाताई बुचके, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.