Robbery  Pudhari
पुणे

Daund Robbery Case: दौंडमध्ये खोरवडी-आळेगाव परिसरात दरोड्याची धाड; 7 लाखांचा ऐवज लंपास

पहाटे १ ते ३.१० दरम्यान पाच ते सात दरोडेखोरांचा हल्ला; चाकू-कोयत्याचा वापर करून घरफोड्या, नागरिकांना मारहाण

पुढारी वृत्तसेवा

दौंड: खोरवडी व आळेगाव (ता. दौंड) परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर धाडसी दरोडा टाकून सुमारे ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. १०) पहाटे घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे १ ते ३.१० वाजण्याच्या दरम्यान खोरवडी व आळेगाव गावांच्या हद्दीतील विविध वाड्या-वस्त्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या व दगडांचा वापर करून नागरिकांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. त्यानंतर घरांमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली आदी ऐवज जबरदस्तीने चोरून नेण्यात आला.

दरोडेखोरांनी अर्चना आवदे, शोभा खोमणे, नकाबाई शिंदे, मुकिंदा चलवादी, मिना कदम, विनय कदम यांच्यासह अन्य कुटुंबांच्या घरांमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटारसायकली असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मल्हारी शिंदे यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT