खोर: गणरायाला निरोप देण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. यवत व दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीजेचा कर्णकर्कश आवाज, मिरवणुकीतील नियमभंग आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या अनुचित प्रकारांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.
दौंडमध्ये १७८ जणांचा बंदोबस्त
दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विसर्जनासाठी एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, ११ सहायक पोलिस निरीक्षक, १०० पोलिस अंमलदार, २३ महिला पोलिस अंमलदार आणि ४० होमगार्ड असा एकूण १७८ जणांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवतला ११२ जणांचा फौजफाटा
यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये एक पोलिस निरीक्षक, चार सहायक पोलिस निरीक्षक, १० पोलिस उपनिरीक्षक, ६० पोलिस अंमलदार आणि ३३ नवप्रविष्ट पोलिस अंमलदार, अशा एकूण ११२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई
विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविणे, ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणे, निर्धारित वेळेचे पालन न करणे किंवा इतर नियमांचा भंग होऊ नये, यासाठी पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याच्या सूचना दौंडचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिल्या आहेत.
विसर्जन मार्गावरील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या...
गणेशभक्तांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम आदींच्या माध्यमातून गणरायाला निरोप द्यावा. उत्सवाचा आनंद घेताना नागरिकांना त्रास होणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.