दौंड : नानविज (ता. दौंड) येथील दत्तात्रय ऊर्फ आबासाहेब माणिकराव पाटोळे यांच्या खूनप्रकरणी त्यांची पत्नी व मुलावर गुरुवारी (दि. ६) गुन्हा दाखल करण्यात आला. उषा पाटोळे आणि संस्कार पाटोळे अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, २ मे रोजी आबासाहेब पाटोळे हे शेतात काम करून घरी दारू पिऊन आले. यावरून मुलगा व पत्नी यांच्याशी त्यांचे जोरदार भांडण झाले. या वेळी त्यांना मारहाण झाली. त्यात ते मरण पावले. परंतु, त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा जबाब पत्नी व मुलाने पोलिसांना दिला होता. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. बिद्री यांनी मयताच्या शरीराची बारकाईने तपासणी करून आबासाहेब पाटोळे यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा कोणत्याही कीटकनाशकामुळे झालेला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर व्यक्ती मारहाणीमुळे मृत्यू पावल्याची व त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावरून उपनिरीक्षक बिद्री यांनी आबासाहेब पाटोळे यांची पत्नी व मुलगा यांच्याकडे चौकशी केली. त्यात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद उपनिरीक्षक बिद्री यांनी दिली आहे.