Police Pudhari
पुणे

Daund Crime Law and Order: दौंडमध्ये वाढती गुन्हेगारी; कडक कारवाईची मागणी

सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची मागणी; हॉटेल स्फोटप्रकरणी निष्पक्ष चौकशीची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

दौंड: दौंड शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि पारदर्शक कारवाई करावी; अन्यथा भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दौंड पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना हद्दपार केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात शहर व तालुक्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव आहे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शहरात परप्रांतीयांची वाढती संख्या आणि भाडेकरूंची अपुरी नोंदणी हा देखील चिंतेचा विषय ठरत आहे. कुरकुंभ एमआयडीसी परिसरात कामानिमित्त येणारे अनेक कामगार शहरात वास्तव्यास असतात; मात्र त्यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे नसल्याची चर्चा आहे. गुन्हा घडल्यावर संबंधित व्यक्ती निघून जात असल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्याचा दावा नागरिक करीत आहेत.

7 जानेवारी रोजी दौंड-पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात दहा कामगार जखमी झाले, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेनंतरही पोलिसांनी केवळ औपचारिक कारवाई केली, अशी टीका होत आहे. गॅस पुरवठादारावर कठोर कारवाई न झाल्याची चर्चा असून, तपासाबाबत “चौकशी सुरू आहे” एवढेच उत्तर दिले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक, पारदर्शक आणि निष्पक्ष भूमिका घ्यावी, तसेच संवेदनशील प्रकरणांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

अझर शेख याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे

अलीकडेच भिगवण येथे घडलेल्या घटनेतील आरोपी अझर शेख याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याला जामीन मिळाला असून, दुसऱ्या गुन्ह्यात अद्याप अटक झालेली नसल्याचे सांगितले जाते. हा गुन्हा काही दिवसांपूर्वीचा असल्याचे पोलिसांनी नमूद केले असले, तरी कारवाईतील विलंबाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक

  • व हद्दपारीची कारवाई.

  • प्रलंबित गुन्ह्यांमध्ये तातडीने अटक व

  • तपासाची गती.

  • भाडेकरू व परप्रांतीयांची सक्तीची नोंदणी मोहीम.

  • हॉटेल जगदंबा स्फोटप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल चौकशी.

  • तपासाची माहिती सार्वजनिक करून पारदर्शकता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT