जावेद मुलाणी
इंदापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यात राजकारणासाठी सातत्याने चर्चेत राहिलेल्या इंदापूर तालुक्यामध्ये हालचालींनी वेग धरला आहे. नेहमीप्रमाणे विद्यमान आमदार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात रण रंगणार असले तरी या वेळी इतरही अनेक नेते त्यांच्या स्पर्धेत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान दत्तात्रय भरणे यांचा 2009 पासून इंदापूरच्या राजकारणात चढता आलेख राहिला आहे. हर्षवर्धन पाटील यांना काही तो रोखता आलेला नाही. उलटपक्षी त्यांनाच सातत्याने प्रत्येक निवडणुकीला पक्ष बदल करावा लागला आहे, तरीही त्यांना यश आलेले नाही. (Latest Pune news)
लोकसभा निकालाचा तितकासा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होत नाही, मात्र विधानसभेला जो आमदार असतो त्यांचा थेट संपर्क आणि तालुक्याला आणलेला विकास निधी त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आमदारांचा वरचष्मा राहतो, हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता भरणे यांचा महामेरू रोखण्यासाठी विधानसभेला सलग तीन वेळा पराभूत झालेले राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोणती नवीन राजकीय खेळी खेळणार का याकडे देखील तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुका जरी स्थानिक कार्यकर्ते, नेतेमंडळी यांच्यामध्ये होत असल्या तरी भरणे आणि पाटील यांचीच खरी लढत पुन्हा दिसून येणार आहे. तालुक्यातील एकूण सात जिल्हा परिषद गटांपैकी काटी- वडापुरी, भिगवण- शेटफळगढे ,पळसदेव-बिजवडी, वालचंदनगर-कळस हे चार गट राष्ट्रवादीकडे आहेत.
तर सणसर-लासुर्णे, निमगाव केतकी-निमसाखर, बावडा-लाखेवाडी हे तीन गट हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आले होते, मात्र मागील निवडणुकांच्या तोंडावर या गटांमध्ये अनेक नेतेमंडळी ही राष्ट्रवादी म्हणजेच भरणे गटाकडे गेल्याचे दिसून येत आहे, याचा फायदा भरणे यांना निश्चित होणार आहे.
इंदापूरच्या नगरपरिषदेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भरत शहा यांच्यामध्ये लढत होती. यामध्ये हर्षवर्धन पाटील गटाला यश मिळाले होते. पुढे शहरातही अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि शहा हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असले तरी त्यांच्याही बारीक राजकीय हालचालींवर व निर्णयावर शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
पंचायत समितीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता होती, तरीही कार्यकाल संपण्याअगोदर विद्यमान पंचायत समिती सभापती स्वाती बापूराव शेंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्यातरी हर्षवर्धन पाटील यांच्या गटात कमालीची शांतता व अस्वस्थता आहे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात कार्यकर्ते पदाधिकारी उतावळे झालेले दिसत आहेत.
प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशाकडे लक्ष
2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरणे, पाटील आणि माने अशी तिरंगी लढत झाली, यामध्ये चाळीस हजार मते घेऊन अपक्ष असलेले सोनाई उद्योग समूहाचे संचालक, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आपली ताकद दाखवून दिली. आता त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे खुले असून लवकरच ते या पक्षात दिसून येतील असा कयास बांधला जात आहे, खरे तर माने अद्याप कशासाठी थांबले आहेत याचे कोडे त्यांच्या निकटवर्तीयांनाही उलगडत नाही.