पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप गुरुवारी होत असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूची आवक वाढली आहे. पावसाच्या तडाख्याने फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून, बाजारात ओली फुले दाखल होण्याचे प्रमाण जवळपास सत्तर टक्क्यांवर गेले आहे. मंगळवारी घाऊक बाजारात एक किलो ओल्या झेंडूला 30 ते 40 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला 100 ते 120 रुपये दर मिळाले आहेत.(Latest Pune News)
गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत फुलांना उच्चांकी मागणी असते. दसऱ्याला झेंडूला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी झेंडूची फुले राखून ठेवतात. फुलबाजारात मंगळवारपासून झेंडूची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, सोलापूर, धाराशीव, बीड, हिंगोली परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीस पाठविला आहे. यंदा पावसामुळे झेंडूचे मोठे नुकसान झाले असून, फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. परिणामी, यंदा झेंडूचे दर तेजीत राहणार असून, सुक्या झेंडूला चांगले दर मिळणार आहेत.
दसऱ्याला झेंडूला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी झेंडू राखून ठेवतात. दसऱ्यापूर्वी झेंडूची तोड केली जाते. त्यानंतर बाजारात झेंडू विक्रीस पाठविला जातो. गुरुवारपर्यंत फुलबाजाराचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. बुधवारी झेंडूची आवक आणखी वाढेल. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूचे दर 100 ते 150 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
दसऱ्यानिमित्त घाऊक बाजारातील फुलांचे दर
झेंडू(सुका) 100 ते 120 रुपये
झेंडू(ओला) 30 ते 40 रुपये
गुलछडी 500 ते 700 रुपये
शेवंती 100 ते 250 रुपये
पावसाच्या तडाख्याने फुलांची प्रतवारी घसरली
ओल्या फुलांच्या तुलनेत सुक्या फुलांना दुप्पट दर