पुणे

Pimpri News : दापोडी पोलिस ठाणे थांबवणार तक्रारदारांची पायपीट

अमृता चौगुले

पिंपरी : पंचेचाळीस चौरस किलोमीटरपेक्षा जास्त मोठी हद्द असलेल्या भोसरी पोलिस ठाण्याचे विभाजन करण्यात येणार आहे. तक्रारदारांच्या सुविधेसाठी कासारवाडी आणि दापोडी चौकीची हद्द एकत्र करून दापोडीत स्वतंत्र पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे. ज्यामुळे सध्या नागरिकांची होणारी पायपीट थांबली जाणार आहे. तसेच, नजीकच्या झोपडपट्ट्यांमध्ये पोलिसांची वर्दळ वाढणार आहे.
पिंपरी- चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.

यामध्ये पुणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील 5 आणि पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्रातील 10 पोलिस ठाणी आयुक्तालयात वर्ग करण्यात आली. दरम्यान, शहराची वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होणारे प्रश्न आदी बाबींचा विचार करून रावेत, शिरगाव आणि महाळुंगे अशी तीन ठाणी नव्याने सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीला आयुक्तालयात एकूण 18 पोलिस ठाणी कार्यान्वित आहेत. या व्यतिरिक्त काळेवाडी, दापोडी, संत तुकारामनगर आणि बावधन पोलिस ठाणे लवकरच सुरू होणार आहे.

भोसरी पोलिस ठाण्यावर ताण

सध्याच्या भोसरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत इंद्रायणीनगर, सद्गुरुनगर, लांडेआळी, धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत, सिद्धार्थनगर, आनंदवन, पवारवस्ती, गुलाबनगर, बोपखेल गाव, सीएमई, गुलीस्ताननगर यासह औद्योगिक परिसर येतो. यामध्ये संमिश्र लोकसंख्या, औद्योगिक वसाहती, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये व सी.एम.ई. (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग) यासारख्या आस्थापना आहेत. सुमारे 45 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ठाण्याचे कार्यक्षेत्र विखुरले आहे. ज्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवून पोलिस दलाचा दरारा निर्माण करणे शक्य होत नाही. त्यामुळे भोसरी पोलिस ठाण्याचे विभाजन करून दापोडी आणि कासारवाडी पोलिस चौकीची हद्द एकत्र करून दापोडी पोलिस ठाणे सुरू होणे गरजेचे आहे.

तात्काळ प्रतिसाद देणे होईल शक्य

सध्याच्या भोसरी पोलिस ठाण्याचा पूर्व- पश्चिम विस्तार एकूण 8.5 किलोमीटर एवढा असून दक्षिण-उत्तर विस्तार हा 5 किलोमीटर इतका आहे. तसेच, दापोडी पोलिस चौक ते बोपखेल हे अंतर सुमारे 14 किलोमीटर आहे. याशिवाय फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी, धावडे बस्ती, लांडेवाडी, भोसरी, रामनगर या परिसरातील नागरिकांना तक्रार देण्यास येण्यासाठी सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतर जावे लागते. या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ पोलिस मदत पोहोचत नाही. दापोडी पोलिस ठाणे सुरू झाल्यास नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळणे शक्य होईल.

भोसरी पोलिस ठाण्याची सद्यस्थिती

  • राज्यभरातून आलेले 8 ते 10 हजार नागरिक या परिसरात स्थायिक झाले आहेत.
  • हिंजवडी, पिंपरी एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, चाकण या परिसरातील कामगारांची संख्या अधिक.
  • इंद्रायणीनगर, सेंच्युरि एन्का परिसर हा सधन लोकसंख्येचा भाग.
  • एमएमएस कॉलनी, दापोडी गावठाण, पवारवस्ती, शांतीनगर या परिसरात झोपडपट्टया आहेत.
  • परप्रांतीय कामगार, मोठया प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारांचे वास्तव्य यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ
  • मिश्र वस्तीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
  • अशी असेल दापोडी पोलिस ठाण्याची हद्द
  • एसएमएस कॉलनी, पवारवस्ती, सिध्दार्थनगर, गुलाबनगर, बॉम्बे कॉलनी, दापोडी गावठाण, एस.टी. वर्क शॉप, सी.एम.ई., बोपखेल,
  • रामनगर, फुगेवाडी, शास्त्रीनगर, केशवनगर, हिराबाई झोपडपट्टी, कुंदननगर, सॅन्डविक, अल्फा लवाल, फॉर्बेस, फ्यूरेशीया,
  • सीआयआरटी कंपनीचा भाग नव्याने सुरू होणार्‍या दापोडी ठाण्याअंतर्गत येणार आहे.

सध्याच्या भोसरी पोलिस ठाण्याची हद्द मोठी आहे. ज्यामुळे पोलिसांना एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी दापोडी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच पोलिस ठाणे कार्यान्वित होईल.

– भास्कर जाधव,
वरिष्ठ निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT