ताथवडे : डांगे चौकात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.
ताथवडे परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर, काही कामेही पूर्ण झालेली आहेत. परंतु, डांगे चौक येथील मुख्य रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी डांगे चौक येथील ग्रेड सेप्रेटरचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. परंतु, चिंचवडकडे जाताना गणेश मंदिरापासून रस्त्याची चाळण झालेली आहे.
मार्च महिन्यात येथील पावसाळी गटाराचे काम सुरू करण्यात आले होते ते काम करण्यासाठी येथील रस्ता पूर्णपणे खोदला गेला आहे. या कामामुळे कित्येक दिवस येथील रस्ता बंद होता. पावसाळी गटाराचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, या कामासाठी खोदलेला रस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे.
हिंजवडीमधील कामे संपून डांगे चौक येथील रस्त्याच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे. दोन-तीन दिवसांत या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. लवकरच हा रस्ता पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल.
– संजय साळी, उप अभियंता, बीआरटीएस
https://youtu.be/YepUS0JEz38