पुणे

आरोग्य व्यवस्थेची दैना : डायलिसिस बंद; रुग्णांचे हाल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा आरोग्य विभाग आणि लायन्स क्लब यांच्यातील संघर्षामुळे अखेर कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद झाले आहे. महापालिकेतर्फे करार रद्द झाल्याचे पत्र लायन्स क्लबला पाठवण्यात आले. सेंटर बंद झाल्याने नियमितपणे डायलिसिस घेणा-या रुग्णांची ससेहोलपट होत आहे. महापालिकेने इतरत्र नवीन सेंटर सुरू केली असली, तरी रुग्णांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे.

कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेवा लायन्स क्लबतर्फे चालवली जात होती. केंद्रातील 15 पैकी 3 मशीन महापालिकेच्या मालकीची, तर उर्वरित 12 एजन्सीच्या मालकीची आहेत. कमला नेहरू रुग्णालयात सररोज 12 ते 15 रुग्ण डायलिसिसची सेवा घेण्यासाठी येतात. मात्र, सेंटर बंद झाल्याने आता उपचार कोठे घ्यायचे, असा प्रश्न रुग्णांसमोर निर्माण झाला आहे.
रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा गोंधळ गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.

रुग्णालयातील निम्म्यापेक्षा जास्त डायलिसिस मशीन बंद असल्याचे जून महिन्यात निदर्शनास आले होते. महापालिका प्रशासनाने लायन्स क्लबला नोटीस दिली होती. त्यानंतर, पुन्हा डायलिसिस सेंटरवरून वाद निर्माण झाला आहे. मशीनची देखभाल केली जात नसल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले, तर महापालिकेकडून वेळच्या वेळी पेमेंट होत नसल्याने सेवा देण्यात अडचण येत असल्याचे लायन्स क्लबतर्फे सांगण्यात आले.

करारनामाच रद्द

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लायन्स संस्थेला डायलिसिस सेंटर 2016 मध्ये चालविण्यास देण्यात आले. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर पुन्हा पाच वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला. महापालिकेचा एका डायलिसिसचा दर 400 रुपये आहे. सरकारी दर 1200 रुपये असल्याने लायन्स क्लबला 400 रुपयांत उपचार देणे अवघड वाटल्याने सेंटर सातत्याने बंद ठेवण्यात येत होते. याबाबत संबंधित प्रकरणात जुलैमध्ये नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कोणताही सुवर्णमध्य न निघाल्याने अखेर करारनामा रद्द करून नोटीस पाठवण्यात आली.

आतापर्यंत रुग्णांना जवळच्या डायलिसिस केंद्रांमध्ये पाठवले जात आहे, जेणेकरून त्यांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होऊ नये. आमच्याकडे शहरात विविध ठिकाणी एकूण 55 मशीन्ससह आणखी सात केंद्रे आहेत. सर्व केंद्रांवर प्रत्येक डायलिसिससाठी केवळ 400 रुपये शुल्क आकारले जाते.

– डॉ. संजीव वावरे, साहाय्यक आरोग्यप्रमुख

हेही वाचा

SCROLL FOR NEXT