पुणे

शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट! सात जणांनी गमावले 92 लाख

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त परतावा, पार्ट टाइम जॉब, मनी लॉन्ड्रिंग, खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी अशी विविध कारणे सांगून सायबर चोरट्यांनी सात जणांची 91 लाख 98 हजार 982 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांकडून उच्चशिक्षितांबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात असल्याचे दिसून येते. शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने महिलेला गंडवले शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची 22 लाख 5 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी उंड्रीमध्ये राहणार्‍या 48 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून अनुराग ठाकूर बोलत असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी महिलेला स्टॉक ट्रेडिंगमध्ये पैसे कमवायचे आमिष दाखवून केकेआरसीए अप्लिकेशन डाऊनलोड करायला लावून त्यात 22 लाख 5 हजार पाठवायला लावून फसवणूक केली आहे.

भीती दाखवून लंपास केले 20 लाख

बँक खात्यावरील रक्कम ही मनी लॉन्ड्रिंगमधील आहे का, याची तपासणी करण्याच्या बहाण्याने एका महिलेची 20 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भुसारी कॉलनी येथे राहणार्‍या 35 वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 15 ते 30 मे दरम्यानच्या काळात दाखल झाली. सायबर चोरट्याने फिर्याद त्यांच्या नावाने एक मोबाईल क्रमांक रजिस्टर असल्याचे सांगून व त्याद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून मुंबई येथे एफआयआर रजिस्टर असल्याचे खोटे सांगून एक लिंक पाठवून सुप्रीम कोर्टाची लिंक आहे, असे सांगून त्यावर कोर्टाच्या व सीबीआयच्या फिर्यादी यांना अटक करण्याच्या ऑर्ड्स खर्‍या असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांच्या बँक खात्यातील रक्कम ही मनी लॉन्ड्रिंगमधील आहे का हे तपासण्याच्या बहाणा करून 20 लाख पाठवायला सांगून फसवणूक करण्यात आली आहे.

महिलेची आठ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने धनकवडी येथील 28 वर्षीय तरुणीची आठ लाख 36 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ड्रग असल्याचे सांगून 8 लाखांना गंडवले

मुंबई ते इराणदरम्यान तुमच्या नावाने ड्रग्स पाठवण्यात येत असल्याचे सांगून अमनोरा येथे राहणार्‍या 58 वर्षीय महिलेची 7 लाख 85 हजार 677 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच कोंढवा भागात राहणार्‍या 44 वर्षीय इसमाला सायबर चोरट्याने फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने मुंबई ते इराण पार्सल पाठवण्यात येत असल्याचे सांगितले. त्या पार्सलमध्ये 5 एक्सपायर पासपोर्ट, 2 लॅपटॉप, 3 डेबिट कार्ड आणि ड्रग्स सापडल्याची भीती दाखवून 7 लाख 3 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कामगार बोलत असल्याचे सांगून फसवले

कॅन्टीनमधील कामगार बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी आळंदी रोड इथे राहणार्‍या एका व्यक्तीची 95 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकाची 25 लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला एनपीसीआय फाइलची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून 25 लाख 69 हजार 297 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सेनादत्त पेठ येथे राहाणार्‍या 72 वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संपर्क करणार्‍या करणदीप आणि मित्तल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात ही घटना घडली. सायबर चोरट्याने फिर्यादी यांच्याशी संपर्क करून एनपीसीआय आणि इतर फाईलची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे पाठवायला सांगितले. फिर्यादी यांनी त्याच्या आणि पत्नीच्या बँक खात्यातील 25 लाख 69 हजार 297 पाठवून फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक घोडके तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT