पुणे : कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी 1 कोटी 44 लाखांना लुबाडल्याचे समोर आले आहे. पहलगाम हल्ल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी करण्यात येणार असल्याची भीती दाखवून, एनआयए चिफ बोलत असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी, ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर ठगांच्या विरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. 23 सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. चोरट्याने एनआयए अधिकारी असल्याची बतावणी ज्येष्ठाकडे केली. ‘पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणातील दहशतवाद्यांच्या खात्यात काही रक्कम जमा करण्यात आली आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे,’ अशी भीती सायबर चोरट्याने त्यांना दाखविली.
या प्रकरणात बँक खात्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगून चोरट्याने, बँक खात्यातील सर्व रक्कम आमच्या खात्यात तातडीने जमा करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याच्या खात्यात वेगवेगळ्या बँकांत ठेवलेले एक कोटी 44 लाख 60 हजार रुपये पाठविले. चौकशीच्या नावाखाली चोरट्याने स्वत:च्या खात्यात जमा करून घेतलेली रक्कम परत मिळाली नाही, तसेच चोरट्याचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधताना व्हिडीओ कॉल सुविधेचा वापर केला असून, बनावट ओळखपत्र दाखविल्याची माहिती तपासात मिळाली आहे. सायबर चोरट्याने ज्या खात्यात रक्कम जमा करून घेतली. त्या बँक खात्याचा, तसेच मोबाईल क्रमांकाची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सक्त वसुली संचालनालय (ईडी), अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) अशा राष्टीय स्तरावरील तपास यंत्रणांची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करून खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.