पुणे : शहरातील नामांकित खासगी विद्यापीठालाच अडीच कोटींचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षित सायबर गुन्हेगाराला अखेर पुणे सायबर पोलिसांनी हैदराबाद येथून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.(Latest Pune News)
सितैया किलारू(वय 34, रा. हैदराबाद) असे त्याचे नाव असून, तो लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलेला, पीएच.डी. मिळविलेला आणि यूपीएससी मुख्य परीक्षा पास झालेला आहे. पण, ऑनलाइन बेटिंगच्या नादाने आयुष्य उद्ध्वस्त झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, 25 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला. विद्यापीठाच्या शैक्षणिक अधिकाऱ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूच्या नावाने मेसेज आला. त्यात आयआयटी मुंबईतील प्राध्यापक डॉ. चेतन कामत यांचा नंबर देण्यात आला होता. किलारुने शासनाने मंजूर केलेल्या एआय व ड्रोन रिसर्च प्रकल्प देण्यासाठी फंडिंग प्रकल्पासाठी 2 टक्के रक्कम भरावी लागेल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून विद्यापीठाने तब्बल 2 कोटी 46 लाख रुपये भरले, पण करारासाठी बोलावल्यावर आरोपी गायब झाला. किलारु हळूहळू ऑनलाईन बेटिंगच्या आहारी गेला.
2022 मध्ये याच कारणावरून पत्नी व मुलांनी त्याला सोडले. एकाकीपण आणि पैशांच्या हव्यासातून त्याने फसवणुकीचा मार्ग निवडला. स्वतःच्या खात्यात पैसे घेतले. विद्यापीठाकडून घेतलेली रक्कम त्याने थेट स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतली. याच धाग्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचे सायबर पोलिसांचे पथक आरोपीपर्यंत पोहचले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, निरीक्षक संगीता देवकाते, पोलिस कर्मचारी संदीप मुंढे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंडे, संदीप कारकूड, टिना कांबळे, अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर, गंगाधर काळे, अदनान शेख, सतीश मांढरे, कृष्णा मारकर यांच्या पथकाने केली.
कोण आहे हा किलारू?
आरोपी मूळचा विजयवाडा येथील 2010 मध्ये ई. एन. टी. सी. इंजिनिअर 2010 ते 2014 स्टॅडफोर्ड युनिव्हसिटी लंडन, यू. के. येथे मास्टर डिग््राी, बिमिंगहम युनिव्हर्सिटी लंडन येथून पीएच. डी.
2015-16 हैदराबाद येथील कोनेरू विद्यापीठात नोकरी
2016 ते 18 बीआरआयटी विद्यापीठात नोकरी
2019 व 2020 यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा पास
2021 मध्ये यूपीएससी तयारीबाबत शिकवणी, 2022 मध्ये कौटुंबिक वाद, त्यानंतर कुठेही नोकरी नाही, ऑनलाइन बेटिंगचा नाद अन् त्यातून झालेले कर्ज, किलारूवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल, गंडा घातलेल्या पैशातून सासऱ्याचे कर्ज फेडले. घरमालकाला 12 महिन्यांचे आगाऊ भाडे दिले, दोन कार खरेदी केल्या, दीड कोटी बेटींगमध्ये उडविले. पोलिसांनी दोन खात्यातील 29 लाख गोठविले असून 10 डेबिट कार्ड, 12 पासबुक, सोने खरेदीच्या पावत्या, चार मोबाईल, टॅब, लॅपटॉप, दागिने, दोन कार असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक केलेल्या आरोपीसह सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार.