अबब! एकच सीताफळ 100 रुपयाला; दिवे बाजारात उच्चांकी भाव Pudhari
पुणे

Custard Apple Price: अबब! एकच सीताफळ 100 रुपयाला; दिवे बाजारात उच्चांकी भाव

शेतकर्‍यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

दिवे: पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक सीताफळाचा हंगाम सध्या सुरू आहे. मात्र यावर्षी एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेसह झालेल्या अतिवृष्टीनंतर फळधारणा कमी प्रमाणात झाल्याने बाजारात आवक घटली आहे. परिणामी सीताफळांना यंदा विक्रमी दर मिळत असून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या दिवे फळबाजारात कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तसेच व्यापार्‍यांसाठी शेडची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या बाजाराला शेतकरी व व्यापार्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून रांजणगाव, पिसर्वे व आसपासच्या गावांतून दररोज 500 ते 600 कॅरेट्स इतकी आवक होत आहे. मात्र माल कमी असल्याने बाजारभाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. (Latest Pune News)

पिसर्वे येथील शेतकरी सोपान वायकर यांनी आणलेल्या 2 कॅरेट्सना तब्बल 8 हजार रुपये इतका भाव मिळाला. त्यातील काही मोठ्या आकाराच्या फळांची किंमत प्रत्यक्षात 100 रुपयांच्या आसपास ठरली. हा हंगामातील आतापर्यंतचा सर्वोच्च भाव ठरला आहे. वायकर यांनी सांगितले की, ’माझ्या 400 झाडांचे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे फळांचा आकार व रंग आकर्षक असून दिवे बाजारात उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मी समाधानी आहे.’

या मालाची खरेदी किशोर काळे या व्यापार्‍याने केली असून त्याचे पॅकिंग करून दिल्ली, कोलकाता व इतर राज्यांत पाठवण्यात येणार आहे. बाहेरच्या राज्यांत मोठ्या आकाराच्या पुरंदर वाणाला प्रचंड मागणी असल्याने स्थानिक बाजारातही चांगला दर मिळत आहे, असे व्यापारी नितीन काळे व मयूर काळे यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT