पुणे शहरावर क्युम्युनोलिंबस ढगांची गर्दी File Photo
पुणे

Pune Rain Update | पुणे शहरावर क्युम्युनोलिंबस ढगांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रविवारपाठोपाठ सोमवारी राखी पौर्णिमेला शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाने जनजीवन पुन्हा विस्कळीत केले. शहरात सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस झाला. मगरपट्टा भागात सर्वाधिक ३८ मिमीची नोंद झाली.

यंदाच्या हंगामात शहरातील एकूण पाऊस ८१५ मिलिमीटर पार झाला आहे. दरम्यान, आगामी ४८ तास हवामान शास्त्रज्ञांनी शहरावर क्युम्युनोलिंबस (बरसणारे पांढरे ढग) ढगांची गर्दी झाल्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. रविवारी शहरात पावसाने दाणादाण उडवून दिली.

शहराच्या सर्वच भागात सरासरी ४० मिमी पाऊस झाला, तर वडगाव शेरी भागात एका तासात १११ मिमी पाऊस झाला. त्यामुळे त्या भागातील अनेक घरे आणि दुकांनात पाणी गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

शहरातील विविध भागांत दहा ठिकाणी मोठ्या झाडपडीच्या घटना घडल्या, तर कोंढवा भागात पाण्यात विद्युत प्रवाह गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे रविवारीदेखील पुणेकर अतिवृष्टीच्या धास्तीने काळजीत होते. कारण राखी पौर्णिमेचा सण होता. मात्र सोमवारी सायंकाळी ६ नंतर पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग कमी असल्याने शहरातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. मगरपट्टा व हडपसर भागात मुसळधार पाऊस झाला.

शहराला क्युम्युनोलिंबस ढगांचा वेढा

हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, शहराभोवती क्युम्युनोलिंबस ढगांचा वेढा आहे. हे ढग पांढऱ्या शुभ्र रंगाचे असून, त्यात भरपूर प्रमाणात बाष्प असते. यात ऋण व धनभार असतो. त्यातील टकरींमुळे विजांचा कडकडाट होतो. त्यामुळे ढगफुटी सारखा पाऊस पडू शकतो. अशा प्रकारच्या ढगांचा वेढा शहराला शनिवारपासून पडला आहे. त्यामुळे शहरात इतका पाऊस होत आहे. आगामी ४८ तास या ढगांची गर्दी शहरावर राहणार असल्याने मध्यम ते मुसळधार पाऊस अजून दोन दिवस पडू शकतो.

ढगफुटीचे सावट अजून ४८ तास

  • सलग दुसऱ्या दिवशीही काही भागात मुसळधार

  • सोमवारीही मगरपट्टा, हडपसर भागात दाणादाण हंगामात शहरात सलग दोन ढगफुटींची नोंद

  • आगामी ४८ तास मध्यम ते मुसळधार पाऊस शहरावर बरसणाऱ्या ढगांची गर्दी

  • शहरात दोन ढगफुटींची नोंद

यंदाच्या मान्सून हंगामात शहरात दोन ढगफुटींची नोंद हवामान विभागाने केली आहे. चिंचवड परिसरात २४ जून, तर वडगाव शेरी भागात १८ ऑगस्ट रोजी ढगफुटी झाली. चिंचवड भागात तासाभरात ११४.५, तर वडगाव शेरीत १११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

शहरावर क्युम्युनोलिबस ढगांची गर्दी झाली असून, हे हवामानाच्या भाषेतले नाव आहे. हे ढग पांढऱ्या शुभ्र रंगाचे असतात. त्यात भरपूर बाष्प असते. त्यामुळे ते कमी कालावधीत जास्त पाऊस देतात. या ढगांत विद्युतभार असल्यामुळे विजांचा कडकडाट होऊन ते एकाच भागात मोठा पाऊस पाडतात. अशा ढगांची गर्दी शहरावर असून, आगामी ४८ तास पावसात जाताना सावधानता बाळगावी.
-डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT