पुणे

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तिसर्‍या दिवशीही बचाव पक्षाकडून उलटतपासणी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील खटल्यात बचाव पक्षाकडून सलग तीन दिवस केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलट तपासणी घेण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या कार्यापासून त्यांच्या हत्येच्या घटनेपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर सिंग यांना प्रश्न विचारण्यात आले. तपासात समोर आलेले मुद्दे त्यांनी उलटत पासणीत न्यायालयास सांगितले. सोमवार (दि. 21) पासून सिंग यांची बचाव पक्षाच्या वतीने प्रकाश साळशिंगीकर आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात उलट तपासणी घेतली. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सिंग यांची साक्ष नोंदवली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बोगस डॉक्टरांविरोधात केलेल्या आंदोलनाचा तपास केला का? बंगाली बाबांनी केलेल्या आंदोलनाची माहिती आहे का? डॉ. दाभोलकरांमुळे पाच बंगाली बाबांना अटक झाली होती. रुद्राक्ष माळेतून फायदा होतो, असे सांगणार्‍या बाबांविरोधात डॉ. दाभोलकर यांनी तक्रार दिल्याबाबत काही तपास केला का? असे प्रश्न बचाव पक्षाकडून सिंग यांना करण्यात आले. त्यावर त्यांनी या बाबींचा तपास केला नसल्याची माहिती दिली.

राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध केला होता. केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या कायद्याला पाठिंबा दर्शविला होता, याची तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. त्यावर सिंग म्हणाले, 'गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक तो तपास केला; मात्र या कायद्याला कोणाचा विरोध होता? याची चौकशी केली नाही.' खुनाच्या दोन दिवस आधी डॉ. दाभोलकर यांच्या जात पंचायतबाबत काही बैठका नियोजित होत्या. जात पंचायतविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांचा खून झाला का? याचा तपास करण्यात आला आहे का? अशी विचारणा सिंग यांना करण्यात आली. त्या अनुषंगाने तपास केला नसल्याचे सिंग यांनी सांगितले. खटल्याची पुढील सुनावणी गुरुवारी (ता. 24) होणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT