पुणे

पाणीटंचाईचे संकट ! भाटघरमध्ये 33, निरा देवघर धरणात 35 टक्के साठा

Laxman Dhenge
भोर : पुढारी वृत्तसेवा : ब्रिटिशकालीन भाटघर धरणात 33 टक्के, तर निरा देवघर धरणात 35.85 टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत 15 टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून 1 हजार 987 क्यूसेकने तर निरा देवघर धरणातून 750 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. सध्या दोन्ही धरणांमधून 2 हजार 740 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 23 टीएमसी क्षमता असलेले भाटघर धरण आणि 11.91 टीएमसी पाणीसाठा असलेले निरा देवघर ही दोन्ही धरणे गतवर्षी 100 टक्के भरली होती.
मागील वर्षी आजच्या दिवशी भाटघरमध्ये 42 टक्के तर निरा देवघर धरणात 55.35 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यावेळी भाटघर धरणात 10 टक्के, तर निरा देवघर धरणात 15 टक्के पाणीसाठा कमी आहे. वीर धरणात सध्या 45.40 टक्के तर गुंजवणी धरणात 44.23 टक्के पाणीसाठा असून गतवर्षी वीर धरणात 63.88 टक्के तर गुंजवणी धरणात 60.27 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत या दोन्ही धरणांमध्ये 18 टक्के पाणीसाठा कमी आहे. वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात 827 क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून 1 हजार 550 क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून पुरंदर, फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या पूर्वेकडील तालुक्यांना पाणी सोडण्यात येत आहे.

 'टाकी भोरला आणि नळ पूर्व भागाला'

भोर, वेल्हे तालुक्यातील भाटघर, निरा देवघर आणि गुंजवणी या धरणांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात 40 टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, उन्हाळ्यात ही धरणे रिकामी होतात. दरवर्षी भोर आणि वेल्हे तालुक्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यामुळे 'टाकी भोरला आणी नळ पूर्व भागाला' अशी अवस्था आहे. भोर तालुक्यात कालवा समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याचे योग्य निर्णय घेतले जात नसल्यामुळे ही अवस्था असून याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT