सिंहगडावर 5 जूनपासून प्लास्टिक बंदी; वन विभागाचे नियोजन सुरू | पुढारी

सिंहगडावर 5 जूनपासून प्लास्टिक बंदी; वन विभागाचे नियोजन सुरू

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : वारंवार स्वच्छता करूनही प्लास्टिकच्या बाटल्या, कचर्‍यामुळे वनसंपदेसह ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण होत असलेल्या सिंहगड किल्ल्यावर येत्या 5 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने नियोजन सुरू केले आहे. घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती व लोकसहभागातून सिंहगडावर मांसाहार, सिगारेटसह प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे प्लास्टिक बंदी कागदावरच असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

गडाच्या तटबंदी, बुरुज तसेच डोंगरदर्‍यात पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, सडलेले अन्नपदार्थ फेकून दिले जात आहे. त्यामुळे किल्ला परिसर विद्रुप होत आहे. किल्ल्यावर मनाई असताना प्लास्टिकच्या पिशव्या, अन्नपदार्थांची पाकिटे बाळगणारे खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेलचालकांवर वन विभाग दंडात्मक कारवाई करत आहे. प्लास्टिक कचरा करणार्‍यांकडून दंडही वसूल केला जात आहे.
वनसंरक्षण समिती व वन विभागाच्या वतीने गडावर स्वच्छता केली जात आहे. याशिवाय शिवप्रेमी संघटना, सेवाभावी कार्यकर्ते गडावर स्वच्छता मोहीम राबवित आहेत.

मात्र गडावर प्लास्टिक कचर्‍याची समस्या कायम कायम आहे. गडाच्या तटबंदीखाली, कडे-कपारीत पडलेला कचरा उचलणे धोकादायक आहे. दुर्गम दर्‍याखोर्‍यात पडलेल्या कचर्‍यामुळे नैसर्गिक पाणवठे वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे (भांबुर्डा) वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली शिवनेरी किल्ल्याच्या धर्तीवर सिंहगड किल्ल्यावरही प्लास्टिक बंदी सुरू करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 28) वन विभागाने गडावर स्वच्छता मोहीम राबवली. सुरक्षारक्षकांसह महिला सहभागी झाल्या होत्या.

सध्या उन्हाळी सुट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक गडावर गर्दी करत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यानंतर 5 जूनपासून सिंहगडावर प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. स्थानिक वनसंरक्षण समिती, गडावरील हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते व लोकसहभागातून प्लास्टिक बंदीचे नियोजन करण्यात येणार आहे. काही प्रमाणात प्लास्टिकचा कचरा कमी झाला आहे. मात्र, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या रिकाम्या पिशव्या, पाकिटे असा कचरा पडत आहे.

– समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग

हेही वाचा

Back to top button