पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवून लुटणारा गुंड रोहन चव्हाण आणि त्याच्या 5 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली. टोळी प्रमुख रोहन जयदीप चव्हाण, किरण रमेश गालफाडे (24, रा. मंगळवार पेठ), जतिन संतोष पवार (21, रा. बिबवेवाडी), अक्षय संजय सगळगिळे (20, रा. लोहगाव), ऋषीकेश फुलचंद रवेलिया (21, रा. लोहगाव), रोहन चव्हाण व अन्य एक साथीदार अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी किरण, जतीन आणि अक्षय यांना अटक केली आहे.
तर, रोहन आणि इतरांचा शोध घेत आहेत. बुधवार पेठेतील व्हिडिओ पार्लरच्या दुकानात घुसून व्यावसायिक व कामगार यांना तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करत जिवे मारण्याची आरोपींनी धमकी दिली. तसेच गल्ल्यातील 5 हजार 360 रुपये चोरून नेले. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर केला होता.
हेही वाचा