पुणे

Crime News : वाहनचालकांना लुटणार्‍या टोळीला अटक

Laxman Dhenge

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : भाडेतत्त्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकास मारहाण करून वाहने चोरणार्‍या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याने संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. पोलिसांनी दोन वाहने हस्तगत केली. शिक्रापूर ठाण्याच्या हद्दीत 15, तर रांजणगाव एमआयडीसी हद्दीत 16 फेब्रुवारी रोजी वाहने चोरीस गेली होती. दोन्ही गुन्ह्यांमध्ये कारमालकांना प्रवासासाठी बाहेरगावी जायचे आहे, असे सांगून गाडी भाड्याने घेण्यात आली होती. निर्जन ठिकाणी कारचालकास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल काढून घेत कार चोरून नेण्यात आल्या. शिक्रापूर ठाण्याच्या हद्दीत एमएच 12 एसवाय 9243 व रांजणगावच्या हद्दीतून एमएच 12 एमडब्ल्यू 9990 ही वाहने चोरण्यात आली होती.

गुन्ह्यातील आरोपी हे प्रवासी म्हणून कारमध्ये ज्या ठिकाणी बसले होते, तसेच आरोपींनी चालकास मारहाण करून ज्या ठिकाणी सोडून दिले होते, त्या ठिकाणांची पाहणी पोलिसांनी केली. दोन्ही वाहने राहुरीच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्हीआधारे दोन्ही वाहने छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याचे शोधून काढले. विकास संतोष दानवे (रा. जवखेडा, जालना) व भरत कडुबा हजारे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे तपासात उघड झाले.

पोलिसांच्या दोन पथकांनी संभाजीनगर शहरातून विकास संतोष दानवे (वय 21, रा. जवखेडा, ता. भोकरदन), भरत कडुवा हजारे (वय 24), विकी एकनाथ पाखरे (वय 26), सीताराम गंगाधर वीर (वय 28, तिघेही रा. आप्पतगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर), सारंग काशिनाथ खाकरे (वय 24, रा. चिंचपूर, ता. सिल्लोड), शिवानंद महादेव दूधभाते (वय 26, रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तेरा लाख रुपयांच्या दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT