पुणे

Crime News : वाणेवाडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ!

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे दोघा चोरट्यांनी रात्रभर उच्छाद मांडला. या चोरट्यांनी तीन घरे फोडत तेथून रोख रक्कम, दागिने अशी सुमारे 9 लाख 60 हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश दिलीप भोसले (रा. भोसलेआळी, वाणेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

त्यांच्यासह मधुकर लक्ष्मण भोसले व संदीप संजय भोसले यांच्या घरी शुक्रवारी (दि. 17) मध्यरात्री ही चोरी झाली. गणेश भोसले यांच्या घरातून 71 हजार रुपयांची चोरट्यांनी तीन तोळ्याची सोन्याची साखळी, 20 हजार 600 रुपयांची अंगठी, सुमारे 28 हजार रुपयांची पिळ्याची अंगठी, लाकडी कपाटात ठेवलेली 50 हजार रुपये रोख रक्कम व खिशातील पाच हजार रुपये अशी 1 लाख 74 हजार रुपयांची चोरी केली.

मधुकर लक्ष्मण भोसले यांच्या घरातून 1 लाख 85 हजार रुपयांचे पाच तोळ्याचे गंठण, 1 लाख 15 हजार रुपयांचे सव्वा दोन तोळ्यांचे मिनी गंठण, 1 लाख रुपयांचे दोन तोळ्यांचे मिनीगंठण, 54 हजार रुपयांची सोन्याची साखळी, 26 हजार रुपयांची कर्णफुले, 10 हजार रुपयांची रोख रककम अशी 4 लाख 90 हजारांची चोरी केली. संदीप भोसले यांच्या घरातून 1 लाख 22 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, गंठण, मनी, पदक तसेच 75 हजार रुपयांच्या दोन लहान अगंठ्या, बदाम व कानातील वाळ्या, नथ तसेच 60 हजार रुपयांची कर्णफुले व 40 हजार रुपयांचे चांदीचा कमरपट्टा, जोडवी, छल्ला, पैंजण, ब—ेसलेट, बिंद्या, वाळे असे दागिने चोरून नेले.

दोन अनोळखी चोरटे अंगामध्ये काळ्या रंगाचे जर्किन घालून आले होते. त्यांनी डोक्यात टोपी घातली होती. 30 ते 35 वयोगटातील ते होते. त्यांनी घराला आतून लावलेली कडी कशाच्या तरी साह्याने उचकटून या तिन्ही घरात प्रवेश करत सुमारे 9 लाख 60 हजार रुपयांची घरफोडी केली. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वाणेवाडीत एकाच रात्रीत झालेल्या या घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिन्ही घरांतून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. एक किलोमीटर अंतरावर करंजेपूल पोलिस चौकी आहे. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने रात्रभर वाहनांची ये-जा असते. तरीदेखील चोरीची घटना घडल्याने ग्रामस्थ कमालीचे भयभीत झाले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT