पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने महिनाभरात गाय दूध खरेदी दरात तीन वेळा वाढ केली आहे. आता दिनांक 1 सप्टेंबरपासून गाय दूध खरेदी दर एक रुपयाने वाढवून आता 35 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती कात्रज दूध संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल ढमढेरे यांनी दिली.
सध्या बाजारात दूध खरेदी दर व पशुखाद्याचे दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना योग्य तो दूध दर मिळण्याच्या हेतूने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांच्या हिताचा विचार करून दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुसार ही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे. (Latest Pune News)
त्यास अनुसरून सणासुदीच्या दिवसात संघाने दिनांक 1 सप्टेंबरपासून गाय दुधाचे (3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी) खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार शेतकर्यांकडील गाय दुधाची खरेदी प्रतिलिटर 35 रुपये दराने होईल. तर दूध संस्थांसाठी वरकड खर्चासह हा दर प्रतिलिटरला 35 रुपये 80 पैसे राहील. दूध खरेदी दरातील वाढीमुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तरी जिल्ह्यातील दूध उत्पादक व सर्व दूध संस्थांनी संघास स्वच्छ, ताज्या व भेसळविरहित उच्चतम गुणप्रतीच्या दुधाचा जास्तीत-जास्त पुरवठा करण्याचे आवाहनही ढमढेरे यांनी केले.
“सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत एकदम वाढ झाली आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या खरेदीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे बटर आणि दूध पावडर उत्पादनासाठीही दुधाची मागणी वाढली आहे. प्रतिकिलोस बटरचा दर 450 रुपये आणि दूध पावडरचा दर 250 रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करणे दूध संघांना स्पर्धेत अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांनाही दिलासा मिळत आहे.- गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, राज्य दूध उत्पादक व प्रक्रिय व्यावसायिक कल्याणकारी संघ, पुणे.