पुणे : पती डॉक्टर आणि पत्नी बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी. दोघांचे करिअर उज्ज्वल; पण आयुष्याची गाडी मात्र दारूच्या आहारी गेलेल्या पतीमुळे रुळावरून घसरली. अखेर मतभेद इतके तीव झाले की, दोघेही वेगळे राहू लागले. वैचारिक विसंवाद आणि ताणलेल्या नात्यांना पूर्णविराम देत या जोडप्याने परस्परसंमतीने घटस्फोटाचा मार्ग निवडला. दोघांचे वय, शिक्षण आणि पुनर्विवाहाची शक्यता लक्षात घेत न्यायालयाने सहा महिन्यांचा ‘कूलिंग ऑफ’ कालावधी रद्द करून जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शुभांगी यादव यांनी हा निकाल दिला.(Latest Pune News)
वासू आणि सपना (नावे बदललेली) यांचे लग्न 14 जून 2020 मध्ये झाले. तो 31 वर्षांचा, तर ती 29 वर्षांची. दोघेही कमावते आहेत. मात्र, पतीला दारू पिण्याचे व्यसन होते. पतीच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे हिंसाचार आणि पती-पत्नीतील संबंध ताणले गेले. वैचारिक मतभेद आणि विसंगतीमुळे अखेर लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघे वेगळे राहू लागले.
दोघांनी ॲड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. कुटुंबांनी देखील दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, दोघांचे समुपदेशनही झाले. मात्र, दोघे पुन्हा एकत्र येणे शक्य नसल्यामुळे सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी रद्द करण्याची मागणी वकिलांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने पक्षकारांचे वय आणि पुनर्विवाहाची शक्यता लक्षात घेऊन कूलिंग ऑफ कालावधी रद्द करीत परस्परसंमतीने घटस्फोट मंजूर केला. ॲड. कुलकर्णी यांना ॲड. मेहेरपूजा माथुर यांनी सहकार्य केले.
वैवाहिक वाद गुंतागुंतीचे असले, तरी दोन्ही पक्ष परस्परसमजुतीने आणि वकिलांच्या मदतीने प्रश्न सोडवू शकतात. त्यानंतर न्यायालयात जाऊन न्याय मिळवू शकतात. परस्परसंमतीने घटस्फोटाची याचिका पती-पत्नींनी संयुक्तपणे आणि स्पष्टपणे दाखल केली. पक्षकारांकडून वेळेवर सूचना आणि वकिलांकडून कागदपत्रांची कार्यक्षम तयारी, यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद पार पडली. त्यामुळे हे प्रकरण केवळ 19 दिवसांत निकाली काढण्यात यश आले.ॲड. निखिल कुलकर्णी, पती-पत्नीचे वकील