Amruta Fadnavis defamation case
पुणे: ’राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले, तरी आक्षेपार्ह पोस्ट करून दुसर्या व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन करण्याचे स्वातंत्र्य नाही,’ असे नमूद करत अमृता फडणवीस यांच्याविषयी समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
भूमिश दीनानाथ सावे (वय 38, रा. नालासोपारा) आणि अभिजित किरण फडणीस (वय 44, रा. वसई) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला आहे. (Latest Pune News)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी सात जणांविरोधात पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार आरोपींनी नियमित, तर दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
आम्ही हा मजकूर पोस्ट केला नसल्याचे सांगत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क असल्याचा दावा बचावपक्षातर्फे करण्यात आला. त्यास, अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया आणि अमृता फडणवीस यांचे वकील अॅड. एस. के. जैन यांनी विरोध केला.
आरोपी एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्यांनी हेतुपुरस्सर हा मजकूर पसरवत जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद केला. सरकार पक्ष, तक्रारदार आणि बचावपक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने अटकेत असलेल्या चार आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला, तर अन्य दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणात आक्षेपार्ह मजकूर लिहिणारा मुख्य आरोपी निखिल संकपाळ (वय 36, रा. कोथरूड, मूळ रा. कोल्हापूर) याला पोलिसांनी नोटीस बजावली असून, हा मजकूर समाजमाध्यमात ’रिपोस्ट’ करणार्या दत्ता चौधरी (वय 37, रा. धाराशीव), बळिराम पंडित ऊर्फ अमित पंडित (वय 42, रा. भांडूप), आशिष वानखेडे (वय 35, रा. अमरावती) आणि शैलेश वर्मा (वय 47, रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली आहे; तर भूमिश सावे (वय 38, रा. नालासोपारा) आणि अभिजित फडणीस (वय 44, रा. वसई) या दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.