प्रशिक्षणार्थी नेमबाज चिमुकलीवर अत्याचार; व्यवस्थापकाला सक्तमजुरी File Photo
पुणे

Pune Crime: प्रशिक्षणार्थी नेमबाज चिमुकलीवर अत्याचार; व्यवस्थापकाला सक्तमजुरी

न्यायालयाने तीन वर्षे शिक्षेसह ठोठावला; सात हजार रुपयांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बालेवाडीतील शूटिंग अकादमीमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या खेळाडू व्यवस्थापकाला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रुद्र गौडा चनवीर गौडा पाटील (वय 28, रा. साई चौक, पाषाण, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. (Latest Pune News)

पीडिता ही जन्माने अमेरिकन असून तिचे वडील भारतीय आहेत. उन्हाळी सुट्यांमध्ये पिस्तूल नेमबाजी शिकायची इच्छा असल्याने तिच्या आईने तिला पुण्यातील बालेवाडीमधील शूटिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. 14, 15 आणि 20 मे 2019 रोजी खेळाडू व्यवस्थापक या पदावर काम करत असलेल्या आरोपीने पीडितेला चहा, नाश्ता, शीतपेय पिण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ येऊन शरीराला व इतर भागाला विशिष्ट हेतूने वेळोवेळी स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्याला पीडितेने वेळोवेळी विरोध करत प्रतिकार केला. याबाबत पीडितेने घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर 20 मे 2019 रोजी पीडितेच्या आईने अकादमी गाठत वरिष्ठांना याबाबत सांगितले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पीडितेच्या आईने अकादमीला ई-मेलद्वारे कळविले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी पीडितेच्या आजीने हिंजवडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल व मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. पुष्कर पाटील व अ‍ॅड. मयूर धाटावकर यांनी काम पाहिले.

यामध्ये सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये, पीडित मुलगी व अकादमीमधील अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची झाली. दरम्यान, पीडितेला बंदूक व्यवस्थित धरता येत नसल्यामुळे आरोपी तिला ओरडला होता म्हणून तिने खोटी केस केली असल्याचा बचाव आरोपीने केला.

पीडितेला आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचे अ‍ॅड. अगरवाल यांनी न्यायालयास कागदपत्रांआधारे दाखवून दिले. तसेच, आरोपीचे आरोप बनावट असल्याचे अ‍ॅड. अगरवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अत्याचार्‍यांच्या कृत्याविरोधात समाजात स्पष्ट संदेश जाणे गरजेचे

आरोपीच्या कृत्याबद्दल अकादमीमधले सीसीटीव्ही कॅमेरा चित्रीकरण आणि वाढत चाललेल्या महिला अत्याचाराविरोधात आणि अकादमीसारख्या ठिकाणी आरोपीतर्फे लैंगिक अत्याचाराच्या कृत्याविरोधात समाजात स्पष्ट संदेश जाणे गरजेचे आहे.

मुलीचे वय, आरोपीचे कृत्य, सर्व साक्षीदारांचे कथन, अभिलेखावरील पुरावे, माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे व पोक्सो (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, 2012) कायद्याअंतर्गत आरोपीच्या घृणास्पद कृत्याकरिता आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. अगरवाल यासह अ‍ॅड. पुष्कर पाटील व अ‍ॅड. मयूर धाटावकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT