पुणे: व्यवसायाच्या जागेवर झालेल्या वादातून व्यावसायिक दांपत्याला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवार पेठ परिसरात घडली. व्यवसायाच्या जागेसाठी अधिक भाडे न दिल्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अजिंठा इलेक्ट्रॉनिक्स समोर, जोगेश्वरी मंदिर लेन, बुधवार पेठ परिसरात 19 सप्टेंबरला सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी मयूर हनुमंत आवळे (वय 30, रा. धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा संबंधित ठिकाणी देवाचे आसन विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर येऊन हातातील काठ्या व बांबूने मारहाण केली गेली. यामध्ये तक्रारदाराच्या पाठीत, हात, पाय व डोक्यावर मारहाण झाली, तर पत्नीच्या कपाळावरही गंभीर मारहाण झाली. त्यात ते दोघेही जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते.
व्यवसायाच्या जागेवरून आणि अधिक भाडे न दिल्याच्या कारणातून ही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि शेजाऱ्यांची चौकशी केली. तसेच आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.